Home अश्रेणीबद्ध पुण्यातील दुर्घटनांनंतर प्रशासनाला आली जाग

पुण्यातील दुर्घटनांनंतर प्रशासनाला आली जाग

धोकादायक इमारती, संरक्षक भितींचा होणार सर्वे : गरज भासल्यास होणार कारवाई

बांधकाम व्यावसायिक संघटनांशी पत्रव्यवहार

क्रेडाई पुणे मेट्रो आणि मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशन यांना देखील पत्र पाठविले आहे. पावसामुळे, अतिवृष्टीमुळे होणाऱ्या नुकसानीची खबरदारी घेण्यासाठी योग्य ते नियोजन करण्याच्या सूचना विकसकांना देण्यास सांगण्यात आले आहे. सीमा भिंतीलगत, नाल्याच्या बाजूस, झाडाखाली कामगारांच्या वसाहती असल्यास त्या त्वरित सुरक्षित ठिकाणी हलविण्यात याव्यात. धोकादायक बांधकामे पाडावीत. बांधकामांच्या मिळकतींमध्ये साचणाऱ्या पावसाच्या निचऱ्याचे योग्य ते नियोजन करावे. खड्डयात, रस्त्यावर पाणी साठून रहदारीस अडथळा होणार नाही. याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पिंपरी – सलग दोन दिवस पुण्यात संरक्षक भिंत कोसळून मनुष्यहानी झाल्याच्या दुर्घटनांनंतर पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनालाही आता खडबडून जाग आली आहे. सीमा भिंतीलगत, झाडाखालील कामगारांच्या वसाहती सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच शहरातील बांधकामे, संरक्षण भिंत, रिटेनिंग भिंत, इमारत बांधकामे याबाबत काही धोकादायक स्थिती आहे का? याचा बीट निरीक्षकांमार्फत 10 दिवसात या सर्व बाबींचा सर्वे केला जाणार आहे. धोकादायक बांधकामे आढळल्यास तातडीने विकसक, सोसायटी धारकांना धोका नष्ट करण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत, अशी माहिती सहशहर अभियंता राजन पाटील यांनी बुधवारी (दि.3) पत्रकार परिषदेत दिली.

पुण्यातील कोंढव्यात संरक्षक भिंत कोसळून 15 मजुरांचा मृत्यू झाला. तर, आंबेगाव येथील सिंहगड महाविद्यालयाची संरक्षक भिंत कोसळून सहा मजूर ठार झाले. पावसाळ्यात शहरातील संरक्षण भिंत पडण्याच्या घटना घडू नयेत त्या पार्श्‍वभूमीवर उपाययोजना केल्या आहेत. अशी माहिती सह शहर अभियंता राजन पाटील यांनी दिली. कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे, शिरीष पोरेड्डी, उपअभियंता विजय भोजने उपस्थित होते.

महापालिकेच्या अ प्रभागात 22, ब प्रभागात 10, क प्रभागात 3, ड प्रभागात 4, इ प्रभागात 3, फ प्रभागात 3 आणि ग प्रभागात 12 अशी शहरात एकूण 57 धोकादायक बांधकामे आढळून आली आहेत. त्यापैंकी 31 मालमत्तांची डागडुजी केली आहे. तीन अतिधोकादायक बांधकामे महापालिकेने पाडली आहेत. तर, उर्वरित बांधकामांची डागडुजी करण्याची सूचना दिली आहे. महापालिकेतर्फे परवानगी देण्यात आलेले, सुरु असलेली बांधकामे, पूर्ण झालेल्या बांधकामांची बीट निरीक्षक पाहणी करणार आहेत. संरक्षण भिंत, रिटेनिंग भिंत, इमारत बांधकामे धोकादायक आहेत काय? हे तपासले जाणार आहे. त्याबाबतचा अहवाल 9 जुलै पर्यंत बीट निरीक्षकांना देण्याच्या सूचना केल्या आहेत.

धोकादायक बांधकाम आढळल्यास तातडीने विकसक, सोसायटी धारकांना पाडण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत. त्यांनी न पाडल्यास धोकादायक बांधकामावर कारवाई केली जाईल. विकसक गृह प्रकल्पाचे डिझाईन नामांकित आर्किटेक्‍टकडून करुन घेतात. परंतु, गृह प्रकल्पातील संरक्षक भिंत, रिटेनिंग भिंत, सुरक्षारक्षकांची केबीन, कार्यालय, पाण्याची टाकी, क्‍लब हाऊस यांचे काम स्थानिक ठेकेदाराकडून केले जाते. यापुढे बांधकाम पूर्णत्वाचा, भाग पूर्णत्वाचा दाखला देताना इमारतीचे स्ट्रॅक्‍चरल स्टॅबिलीटी सर्टीफिकेट घेणे बंधनकारक केले आहे. बांधकाम डिझाईननुसार केल्याचे हमीपत्र घेतल्याशिवाय बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिला जाणार नाही, अशी माहिती पाटील यांनी यावेळी दिली.