Home ताज्या बातम्या पुण्यात सुरक्षिततेसाठी ३१ हजार ५०० सीसीटीव्हीद्वारे गणेशोत्सवावर ‘वॉच’

पुण्यात सुरक्षिततेसाठी ३१ हजार ५०० सीसीटीव्हीद्वारे गणेशोत्सवावर ‘वॉच’

0

पुण्यात सुरक्षिततेसाठी ३१ हजार ५०० सीसीटीव्हीद्वारे गणेशोत्सवावर ‘वॉच’*

गणेशोत्सव दिमाखात व शांततेत पार पडावा, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे विघ्न येऊ नये, यादृष्टीने पुणे पोलिस दलाकडून कडक बंदोबस्त ठेवला जाणार आहे. 

देश-परदेशांतील लाखो भाविक पुण्यामध्ये येणार असल्याने त्यांच्या सुरक्षिततेसाठी सर्व उपाययोजना केल्या आहेत; तसेच ३१ हजार ५०० सीसीटीव्हीद्वारे गणेशोत्सवावर ‘वॉच’  ठेवण्यात येणार आहे. केंद्र सरकारने काश्‍मीरबाबत घेतलेला महत्त्वाचा निर्णय, सर्व राज्यांना दिलेला सतर्कतेचा इशारा व अन्य कारणांमुळे गणेशोत्सव अधिकाधिक सुरक्षिततेत पार पाडण्यासाठी पुणे पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, सहपोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी गणेशोत्सवातील बंदोबस्ताबाबतचा आढावा घेतला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त मितेश घट्टे यांनी बंदोबस्ताची रचना केली आहे. 

असा  आहे बंदोबस्त
  अपर पोलिस आयुक्त – तीन
  पोलिस उपायुक्त – १२
  सहायक आयुक्त – ३०
  पोलिस निरीक्षक – ८१
  सहायक पोलिस निरीक्षक/उपनिरीक्षक – ३६४
  पोलिस कर्मचारी – ३८२७
  गृहरक्षक दल जवान – ६००
  राज्य राखीव पोलिस दल – दोन कंपन्या 

या आहेत उपाययोजना
  चोरी, छेडछाड रोखण्यासाठी गुन्हे शाखेची पथके कार्यरत राहणार
  मानाच्या, प्रमुख मंडळ परिसरात धातुशोधक यंत्रे (मेटल डिटेक्‍टर)
  बाँबशोधक व नाशक पथकाकडून होणार कसून तपासणी
  स्थानिक पोलिस व गुन्हे शाखेची पथके कार्यरत राहणार

गणेशोत्सव अधिकाधिक चांगल्या पद्धतीने पार पडावा, यासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. प्रमुख मंडळे, गर्दीची ठिकाणे, संवेदनशील मंडळे अशा ठिकाणी जादा पोलिस तैनात केले जाणार आहेत. त्याचबरोबर सीसीटीव्हीद्वारे गणेशोत्सवामध्ये लक्ष ठेवले जाणार आहे. 
– मितेश घट्टे, पोलिस उपायुक्त, विशेष शाखा

येथे साधा संपर्क
गणेशोत्सवात नागरिकांना कोणत्याही प्रकारची बेवारस वस्तू, संशयित व्यक्ती आढळल्यास त्यांनी तातडीने पोलिस नियंत्रण कक्षाशी (दूरध्वनी क्रमांक ः १०० किंवा ०२०-२६१२६२९६) संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

गणेशोत्सव  मंडळे – ३२९५
ऑनलाइन  नोंदणी – १९९४
नोंदणीकृत  मंडळे  – २३१८
बिगर  नोंदणीकृत – ९७७

महोत्सवी वर्ष साजरे करणारी मंडळे
  शतकोत्तर रौप्य महोत्सव – २ 
  अमृत महोत्सव           – ३ 
  सुवर्ण महोत्सव           –  ९ 
  रौप्य महोत्सव           –  १४