पुनर्विकसित सावदा रेल्वे स्टेशन शेतकऱ्यांसाठी फायद्याचे; खत व केळीसाठी रॅक सुविधा उपलब्ध – केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे – महासंवाद

पुनर्विकसित सावदा रेल्वे स्टेशन शेतकऱ्यांसाठी फायद्याचे; खत व केळीसाठी रॅक सुविधा उपलब्ध – केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे – महासंवाद
- Advertisement -

जळगाव, दि. २२ (जिमाका वृत्तसेवा) – अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत जिल्ह्यातील सावदा रेल्वे स्थानकाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण झाले. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी, “या स्थानकावर प्रवाशांसह शेतकऱ्यांसाठी रॅक सुविधा निर्माण करण्यात आली असून, खत आणि केळी वाहतुकीसाठी ती उपयुक्त ठरणार आहे,” असे सांगितले.

या कार्यक्रमास आमदार अमोल जावळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, भुसावळ रेल्वे विभागाच्या विभागीय व्यवस्थापक इति पांडे यांच्यासह रेल्वे अधिकारी, स्थानिक नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यमंत्री खडसे म्हणाल्या की, “जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी रस्ते, रेल्वे आणि विमानवाहतूक या तिन्ही सुविधा आता उपलब्ध असून त्यामुळे प्रगतीला गती मिळाली आहे. सावदा, रावेर व भुसावळ येथून शेतमालाची जलद वाहतूक शक्य झाली आहे. आता सावदा येथे खत वाहतुकीसाठी रॅक सुविधा तयार करण्यात आली आहे. तसेच, प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा असलेले नवे स्टेशन उभारण्यात आले आहे. येथे अधिक गाड्यांचे थांबे मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील.”

राज्यमंत्री खडसे यांनी केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी सावदात केळी क्लस्टर विकसित होत असल्याची माहितीही यावेळी दिली. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘विकसित भारत’ हे स्वप्न साकारत असून त्यामध्ये रेल्वे आणि रस्त्यांचे महत्त्वाचे स्थान आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

आ. अमोल जावळे यांनी सांगितले की, “राज्यमंत्री खडसे यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील अनेक महत्त्वाची कामे मार्गी लागत असून, शेतमाल वाहतुकीसाठी सावदा आणि रावेर स्थानकांवर विशेष सुविधा उपलब्ध झाल्या आहेत, हे जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.”

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की, “प्रवासी सुविधांबरोबरच शेतमाल वाहतुकीसाठी सुविधा निर्माण होत असून, गतीशक्ती कॉरिडॉरमध्ये जळगाव जिल्ह्याचा समावेश झाल्यामुळे आणखी लाभ मिळणार आहेत.”

भुसावळ रेल्वे विभागाच्या डीआरएम इति पांडे म्हणाले की, “महाराष्ट्रातील १२ रेल्वे स्थानकांचे लोकार्पण आज पंतप्रधानांच्या हस्ते झाले असून, त्यापैकी ५ स्थानके भुसावळ विभागांतर्गत आहेत. त्यात सावदा रेल्वे स्टेशनचा समावेश असून, हे स्थानक आता दिव्यांग सुलभ करण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांना अधिक सोयी उपलब्ध होतील.”

००००००००

- Advertisement -