Home शहरे मुंबई पुन्हा एकदा 26 जुलै…अंबरनाथ, बदलापूरमध्ये पावसाचा हाहाकार

पुन्हा एकदा 26 जुलै…अंबरनाथ, बदलापूरमध्ये पावसाचा हाहाकार

कल्याण : मुंबईसह उपनगरात जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर परिसरात पावसानं थैमान घातलं आहे. अनेक सखल भागात पाणी साचलं असून बदलापूर स्टेशन येथील रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्याने लोकल सेवा ठप्प झाली आहे. 

मागील काही तासांपासून कल्याण, बदलापूर परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. अंबरनाथ येथील शिवमंदिरातही गुडघाभर पाणी साचलं आहे. पावसाचा जोर असाच कायम राहणार असून नागरिकांनी दक्षता घ्यावी असं आवाहन हवामान खात्याने केलं आहे. 

तर मुसळधार पावसाने वालधुनी नदीला पूर आला आहे. उल्हासनगरमधील रेणुका सोसायटी, सम्राट अशोकनगर, संजय गांधीनगर, हिराघाट , शांतीनगर परिसरात पुराचे पाणी नागरिकांच्या घरात घुसले आहे. प्रशासनकडून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. शहरातील नाले, गटारे तुंबून वाहू लागल्याने लोकांची गैरसोय होत आहे. 

अंबरनाथ, बदलापूर येथे रेल्वे रुळ पाणी खाली गेल्याने मध्य रेल्वेकडून वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी स्थानिक प्रशासनाच्या सहाय्याने रुळावरील पाणी हटविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.