पुलवामा हल्ल्यामधील शहीदाच्या कुटुंबाची परवड, ना मिळाले 50 लाख; ना मिळाली जमीन

- Advertisement -

जयपूर: 14 फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर देशात उसळलेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर बालाकोट येथे एअर स्ट्राइक करून या हल्ल्याचा बदला घेण्यात आला होता. दरम्यान, या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना सरकारकडून विविध आश्वासने देण्यात आली होती. मात्र यापैकी अनेक जवानांच्या कुटुंबीयांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झालेली नसल्याचे समोर येत आहे. 

राजस्थानमधील हवालदार हेमराज मीणा हे पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्यात शहीद झाले होते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी राजकीय नेत्यांची रीघ लागली होती. सरकारी पातळीवरून त्यांना विविध आश्वासने देण्यात आली. त्यामध्ये शहीद हेमराजच्या पत्नीला 50 लाख रुपये रोख किंवा 25 लाख रुपये रोख आणि 25 बीघा जमीन देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. तसेच शहीदाच्या आई-वडिलांना आर्थिक मदत आणि मुलांना मोफत शिक्षण देण्याचे आश्वासन दिले गेले होते. 

मात्र घटनेला पाच महिने उलटून गेल्यानंतरही यापैकी एकाही आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. सरकारी यंत्रणांच्या या  प्रवृत्तीबाबत शहीद हेमराजचे वडील हरदयाल मीणा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ” हेमराज शहीद झाल्यानंतर असेक जण भेटायला आहे. चिंता करू नका. आम्ही तुमच्यासोबत आहोत. हेमराज हा देशासाठी शहीद झालाय. पण आम्हाला तुमचा मुलगा समजा. आम्ही तुमच्या कुटुंबाची काळजी घेऊ, अशी आश्वासने त्यांनी दिली. मात्र आमची काळजी घेण्याची गोष्टच सोडा, पण नंतर कुणी साधे भेटायलाही आले नाहीत.” अशी खंत शहीद हेमराजच्या वडिलांनी व्यक्त केली. 

- Advertisement -