गुवाहाटी :आसामवर आधीच पुराचे संकट कोसळलेले असताना आसाम आणि अरुणाचल प्रदेशसह ईशान्येकडील राज्यांना आज भूकंपाचे धक्के बसले. रिश्टर स्केलवर ५.६ इतकी या भूकंपाची तीव्रता होती. अरुणाचल प्रदेशातील पूर्व कामेंग जिल्ह्यात भूकंपाचा केंद्रबिंदू होता. दरम्यान, भूकंपात कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
आसाममधील २९ जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला आहे. पुरामुळे आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू झाला असून तब्बल ५४ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवावे लागले आहे. राज्यात आधीच पुरामुळे हाहाकार माजलेला असताना आज भूकंपाचे धक्के बसल्याने नागरिक आणखीच भयभीत झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी २ वाजून ५२ मिनिटांनी आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, नागालँड आणि अन्य भागांना भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असे पोलिसांनी सांगितले.