Home ताज्या बातम्या पूर पीडितांना पूर्ण शक्तिनिशी मदत करणार – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

पूर पीडितांना पूर्ण शक्तिनिशी मदत करणार – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

0
पूर पीडितांना पूर्ण शक्तिनिशी मदत करणार – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

भर पावसात चिचपल्ली आणि पिंपळखुट येथील नागरिकांसोबत संवाद

चंद्रपूर, दि. 24 : गेला आठवडाभर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. अशात चिचपल्ली येथे तलाव फुटल्याने प्रचंड मोठे नुकसान नागरिकांना सहन करावे लागले. चिचपल्ली येथील नागरिकांना प्रशासन व पदाधिकाऱ्यांमार्फत सर्वतोपरी मदत पुरविण्याच्या सूचना मी आधीच दिलेल्या आहेत. आज (दि.24) पुराची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे माझ्या निदर्शनास आले. घरातील धान्याची नासाडी झाली आहे. घरातील कपडे व इतर साहित्य पाण्यासोबत वाहून गेले आहे. या संकटाच्या काळात शेवटच्या नुकसानग्रस्त गरजूपर्यंत मदत पोहचविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. पूरपीडितांच्या पाठीशी पूर्ण शक्तिनिशी उभा राहील, असा शब्द राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.

चिचपल्ली येथे पुराची पाहणी केल्यानंतर नागरिकांशी संवाद साधताना श्री. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, उपविभागीय अधिकारी संजय पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव, तहसीलदार विजय पवार, पोलिस निरीक्षक सुनील गाडे, नायब तहसीलदार जितेंद्र गादेवार, संध्या गुरुनुले, डॉ.मंगेश गुलवाडे, रामपाल सिंग, हनुमान काकडे, गौतम निमगडे, अशोक आलाम, सोहम बुटले आदी उपस्थित होते.

पुरामुळे ज्या घरांमध्ये पाणी शिरले आहे किंवा नुकसान झाले आहे, अशा सर्व नागरिकांची जिल्हा परिषदेच्या शाळेत राहण्याची तसेच जेवणाची व्यवस्था करण्याच्या सुचना दिल्या आहेत. पूरपीडितांना चहा-बिस्कीटसह नाश्ता व उत्तम जेवण द्यावे. नागरिकांना तेल, मीठ, तिखट, धान्य, कणीक यासोबतच कपडे देण्यात येईल. तसेच गाद्या, चादर, ब्लँकेटची व्यवस्था करावी. चिचपल्ली येथील पूरपीडित कुटुंबाना पहिली मदत म्हणून 5 हजार तात्काळ जमा होणार आहे. या पूरपरिस्थितीबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून दुसरी मदत जास्तीत जास्त मिळावी, यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. गावातील नाल्यावरील अतिक्रमण काढून त्यांचे पुनर्वसन करून देऊ. तसेच पुल मोठा करण्याबाबतही उपाययोजना केल्या जातील, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

पालकमंत्री म्हणाले, ‘पाऊस ओसरल्यानंतर फुटलेल्या तलावाची कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात येईल. तसेच पावसानंतर साथरोग पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे आरोग्य विभागाने नागरिकांची तपासणी करावी. तसेच नालेसफाई, बोअरीग, विहीर आदींमध्ये ब्लिचींग पावडरची फवारणी करावी. ज्या नागरिकांचे धान्य, भांडे, बकऱ्या, बैलजोडी वाहून गेली, त्यांची यादी करावी, अशा सूचनाही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

पंचनाम्यापासून एकही जण सुटणार नाही : ज्या घरांचे नुकसान झाले आहेत, त्याचे पंचनामे फोटो आणि व्हीडीओ घेऊन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नुकसान झाले पण घर पडले नाही, आणि दोन दिवसांनी कदाचित ते घर पडू शकते, अशाही घरांचे पंचनामे करावे. पंचनाम्यापासून एकही घर सूटणार नाही, याची काळजी घ्यावी. गावात पंचनामे झाल्यानंतर गावकऱ्यांनीच कोणी सुटणार नाही याची खात्री करावी. तसेच पंचनाम्याची यादी ग्रामपंचायतीमध्ये जाहीर करावी, अश्या सूचनाही पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिल्या. 

चिचपल्ली येथे 224 तर पिंपळखुट येथे 109 लोकांचे पैसे जमा होण्यास सुरवात

चिचपल्ली आणि पिंपळखुट येथे पूरपीडितांसोबत संवाद साधत असतानाच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पूरग्रस्तांना पहिली मदत पाच हजार रुपये तात्काळ बँकेत जमा करण्यासाठी अधिकाऱ्यांना दूरध्वनी केला. लगेच खात्यात पैसे जमा होत असल्याचे मॅसेज नागरिकांकडून प्राप्त झाले, असे तहसीलदार विजय पवार यांनी सांगितले. चिचपल्ली येथील 224 तर पिंपळखुट येथील 109 लोकांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत.

धनादेशाचे वाटप : पुरामध्ये बकऱ्या आणि बैलजोडी वाहून गेलेल्या नागरिकांना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले. यात चिचपल्ली येथील देवरात मत्ते यांना 17200 रुपयांचा धनादेश, बाबुखान पठाण यांना 8 हजार रुपयांचा धनादेश, वसंत मडावी यांना 8 हजार, भाऊराव दुर्योधन यांना 16 हजार रुपये, प्रमोद आडे यांना 60 हजार रुपये तर दिनेश लाकडे यांना 84 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. सोबतच पिंपळखुट येथील अभिमन्यू आत्राम यांना 16 हजार रुपयांचा आणि महादेव आत्राम यांना 28 हजार 600 रुपयांचा धनादेश देण्यात आला.