Home ताज्या बातम्या पेण तळे गावात विचित्र रोगाने जनावरे दगावण्याचे सत्र अद्याप सुरुच ; मृत्यूचे गूढ शोधण्यात पशु वैद्यकीय विभाग नापास

पेण तळे गावात विचित्र रोगाने जनावरे दगावण्याचे सत्र अद्याप सुरुच ; मृत्यूचे गूढ शोधण्यात पशु वैद्यकीय विभाग नापास

बोरघर (माणगांव ):( विश्वास गायकवाड ) आठ वर्षां पूर्वी माणगांव तालुक्यातील पेण तर्फे तळे गावातील अनेक शेतकऱ्यांची बरीचशी जनावरे उदाहरणार्थ गाय, बैल आणि वासरे अचानक आलेल्या अज्ञात रोगाची शिकार झाली होती. त्यामुळे पेण तर्फे तळे गावातील या पिडीत गरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तेव्हा पासून आजपर्यंत या विचित्र रोगाने या गावातील शेतकऱ्यांची जनावरे दगावण्याचे दुष्ट सत्र निरंतर पणे सुरुच आहे.

सदर विचित्र प्रकारा विषयी या शेतकऱ्यांनी संबंधित पशु वैद्यकीय विभागातील पशु वैद्यकांना वेळोवेळी माहिती देऊन त्या त्या वेळी रोगग्रस्त जनावरांवर योग्य ते उपचार करून घेतले. परंतु काही प्रकरणात सदर उपचार घेण्याआधी तर कधी उपचारा दरम्यान अनेक जनावरांचा शेतकऱ्यांच्या डोळ्या समोर दुर्दैवी मृत्यू झाला. आजपर्यंत तब्बल आठ ते नऊ वर्षाच्या काळात पेण तर्फे तळे ( वरची आळी ) या विभागातील शेतकरी श्री. सखाराम धोंडू जाबडे यांनी शेतीच्या कामासाठी एक बैल दगावल्यावर दुसरा बैल विकत आणला परंतु या विचित्र रोगाने त्यांच्या बैलांचा पिच्छा सोडला नाही. असे एका मागून एक एकूण दहा बैल या अज्ञात रोगाचे शिकार ठरले. या पैकी केवळ पंधराच दिवसां पूर्वी त्यांचे दोन नांगराचे बैल गोठ्यातच अचानकपणे दगावले. या दुर्दैवी घटनेला पंधरा दिवस होतात न होतात तर त्यांनी शेतीच्या कामासाठी नव्याने आणलेल्या नवीन बैलांची जोडी शनिवार दिनांक १३ जुलै रोजी सकाळी अचानक त्याच आजाराच्या लक्षणांनी आजारी पडलेली दिसून आली.

त्या दोन्ही बैलांच्या शौचातून प्रचंड प्रमाणात रक्तस्राव होत होता. त्याच बरोबर त्यांना प्रचंड प्रमाणात थंडी वाजून काफरे भरले होते. त्याच बरोबर त्यांच्या तोंडातून जीभ बाहेर येवून लाळ गळून ते पेंढा वा पाणी प्यायचे बंद झाले होते. त्यामुळे श्री. सखाराम जाबडे घाबरून गेले त्यांनी तात्काळ पशु वैद्य डॉ. परदेशी यांना फोन करून बोलावले डॉ परदेशी घटनास्थळी पोहोचण्याच्या आधीच एका बैलाचा मृत्यू झाला. ऐन भात लावणीच्या हंगामात श्री. सखाराम जाबडे यांच्या शेतीच्या कामाच्या एका बैलाचा अचानक या अज्ञात रोगाने मृत्यू झाल्यामुळे या गरीब शेतकऱ्याच्या शेतीचे अर्थात भात लावणीचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे. रखडले आहे. डॉ. परदेशी यांनी घटनास्थळी आल्यावर दुसऱ्या बैलाला त्याची योग्य तपासणी करून त्यांना विषबाधा झाल्याचा निष्कर्ष काढला. बाधित बैलाची लक्षणे पाहून त्याला तात्काळ औषधोपचार सुरू केले. त्यामुळे या बैलाच्या प्रकृतीमध्ये थोडा फरक पडला आहे. डॉ. परदेशी यांनी मृत आणि बाधित ( आजारी ) दोन्ही बैलांच्या विषबाधा सदृश्य परिस्थितीचे आवश्यक नमुने पुढील तपासणी साठी संबंधित प्रयोगशाळेत पाठवले आहेत. संबंधित दुर्दैवी घटनेचे रीपोर्ट मंगलवार ते बुधवारी मिळतील असे त्यांनी सांगितले. श्री. सखाराम जाबडे यांच्या प्रमाणें गेल्या आठ वर्षात पेण तर्फे तळे गावच्या वरच्या आळीतील श्री. शांताराम इप्ते, श्री. नारायण भागणे, श्री. प्रकाश मांडवकर, श्री. अनिल मांडवकर, श्री. पांडुरंग गावडे, श्री. नारायण इप्ते, श्री. केशव मोंडे, श्री. सुधीर पोटले, श्री. रमेश मोंडे, श्री. नारायण मोंडे, श्री. भागोजी पोटले इत्यादी गरीब कष्टकरी शेतकऱ्यांची शेकडो गाय, बैल, वासरे या अत्यंत गंभीर अज्ञात रोगाची शिकार झालेली आहेत. आणि अजूनही होत आहेत. या दुर्दैवी घटनांचे पंचनामे व माहिती रिपोर्ट त्या त्या वेळी संबंधित विभागा मार्फत त्यांच्या प्रयोग शाळांना पाठवून सुद्धा संबंधित विभागाला या विचित्र रोगाचे नाव अथवा त्याच्यावर प्रभावीपणे अटकाव आणणारी उपाययोजना अथवा त्या रोगाचे समुळ उच्चाटन करता आलेले नाही. त्यामुळे संबंधित विभाग या विचित्र अज्ञात रोगा समोर पुरता हतबल होवून पूर्णपणे नापास झाला आहे असे संबंधित बाधित शेतकरी आणि नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या अज्ञात रोगाच्या तडाख्यात सापडून ज्या ज्या शेतकऱ्यांच्या पशु धनाचे हकनाक नुकसान झाले आहे त्या त्या शेतकऱ्यांना अद्याप पाच पैशांची देखील संबंधित विभागात कडून अथवा शासनाने कडून नुकसान भरपाई वा आर्थिक मदत मिळालेली नाही तरी ती शक्य तितक्या लवकर मिळावी ही या शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.