तिथून खऱ्या अर्थानं सुरू होतं विमल अन् बाळूचं परिस्थितीशी द्वंद्व. ‘काय’ आणि ‘कसं’ हे भाव क्षणोक्षणी विमलच्या चेहऱ्यावर दिसत राहतात. सासूआई जिवंत आहेत, हे भासविण्यासाठी विमलचे प्रयत्न तिच्यावरील हलाखीची परिस्थिती अधोरेखित करतात. गावातला श्रीमंत सावकार एकीकडे अन् शंभर रुपयांचीही भ्रांत असलेला विमलचा परिवार एकीकडे… अशी दरीही यात जाणवते. ही कथा साधारणत: १९९० च्या दशकातील आहे. एक गाव अन् त्यातली वेगवेगळ्या स्वभावाची माणसं दिग्दर्शकानं चांगली उभी केली आहेत. रात्री-अपरात्री धावून येणारे शेजारी यात दिसतात; तर शंभर रुपयांसाठी फक्त पेन्शनच्या दिवशी आईला भेटायला न चुकता येणारी विमलची नणंदही दिसते. भोर परिसरात या चित्रपटाचं चित्रीकरण झालंय. दिग्दर्शकाला हवं असलेलं ‘लोकेशन’ तिथं मिळालं, हे जाणवतं. राजा फडतरे यांनी कॅमेऱ्याचा चांगला वापर केलाय. परेश मांजरेकर यांनी संकलनाचा चांगला प्रयत्न केलाय.
सोनाली गुणी अभिनेत्री आहे. तिनं विमलची भूमिका समरसून साकारली आहे. चित्रपटाच्या श्रेयनामावलीसाठी ‘सूर्य उगवला गगनी, जीव माझा चक्रपाणी’ यासह जात्यावरचं लोकगीतही तिनं गायलं आहे. नीलांबरी खामकर यांनीही भूमिका चांगली साकारली आहे. बाळूच्या भूमिकेतील सुमित गुट्टे नवखा असला; तरी सहज वावरला आहे. ग्लॅमरच्या या गर्दीत आशय उजवा ठरतो. म्हणूनच तर ‘इरॉस नाऊ’नं हा चित्रपट घेतला. अगदी छोटी कथा; पण त्यातला भाव मोठा. संवेदनशील प्रेक्षकांसाठी ही कलाकृती आहे. बस्स, ती मनातून अनुभवावी.
पाहा ट्रेलर:
पेन्शन
लेखक-दिग्दर्शक ः पुंडलिक धुमाळ
निर्माते ः स्वतंत्र (सवी) गोयल, सविना क्रिएशन
संगीत-पार्श्वसंगीत ः अरविंद सागोळे
कलावंत ः सोनाली कुलकर्णी, सुमित गुट्टे, नीलांबरी खामकर, वृंदा बाळ, नारायण जाधव आदी.
ओटीटी ः इरॉस नाऊ
दर्जा ः तीन स्टार