पैशांच्या मोठ्या व्यवहारातून तरुणावर गोळीबार; हल्लेखोर मुंबईच्या गुन्हेगारी विश्‍वातील

- Advertisement -

*पैशांच्या मोठ्या व्यवहारातून तरुणावर गोळीबार; हल्लेखोर मुंबईच्या गुन्हेगारी विश्‍वातील*

राजगुरुनगरजवळील चांडोली (ता. खेड) येथे कडुस रस्त्यावर रावेत येथील एका तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. मात्र अद्यापही याबाबत खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झालेली नाही. पैशांच्या मोठ्या व्यवहारातून हा गोळीबार झाला असल्याची माहिती असून, हल्लेखोर मुंबईच्या गुन्हेगारी विश्‍वातील असल्याचे समजते. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलेश भास्कर टिळे (वय ३०, रा. रावेत, पिंपरी-चिंचवड) असे गोळी लागून जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर भोसरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. टिळे याला पैशांच्या बदल्यात मोठ्या फायद्याचे आमिष दाखवून काही लाखांमध्ये रक्कम घेऊन राजगुरूनगरजवळील चांडोली फाट्यावर बोलाविले. त्याच्या साथीदारांसह तो त्या ठिकाणी आला असता, त्याला त्याच्याच वाहनातून काही अंतरावर कडूसच्या बाजूला नेले. त्या ठिकाणी पिस्तुलाचा धाक दाखवून पैशांची बॅग लुटण्याच्या प्रयत्न केला. त्याने प्रतिकार केला असता, त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. मांडीला गोळी लागल्याने जखमी झालेल्या टिळेला साथीदारांनी भोसरीच्या रुग्णालयात दाखल केले.

शनिवारी दुपारी ही घटना घडूनही खेड पोलिसांकडे याबाबत कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. तसेच त्यांच्याकडे काहीही माहिती नसल्याचे ते सांगत आहेत. याप्रकरणी फिर्याद देण्यास जखमी तयार नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र आज दिवसभर खेड पोलिस ठाण्यात मुंबईच्या काही इसमांची वर्दळ होती.

- Advertisement -