पोंभुर्णा व सावली येथील वसतिगृह सुरु करण्याची कार्यवाही

- Advertisement -

प्राधान्याने पुर्ण करण्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश…

मुंबई : चंद्रपूर जिल्हयातील पोंभुर्णा आणि सावली येथे अनुसुचित जमातीच्या मुलां-मुलींकरिता नवीन वसतिगृह सुरु करण्याची कार्यवाही प्राधान्याने पुर्ण करण्याचे निर्देश अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

यावर पोंभुर्णा आणि सावली येथे वसतिगृहांसाठी भाडेतत्वावर इमारती घेण्यात आल्या असून आवश्यक फर्निचर व साहित्य त्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले असून वसतिगृहे त्वरित सुरु करण्यात येतील असे आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके यांनी सांगितले.

पोंभुर्णा आणि सावली येथे अनुसुचित जमातीच्या मुलां-मुलींकरिता नवीन वसतिगृहे सुरु करण्याबाबतची बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती.  बैठकीला आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके, आदिवासी विकास आयुक्त नितीन पाटील, आदिवासी विकास विभागाचे उप सचिव श्री. सुब्बराव शिंदे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग व आदिवासी विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पोंभुर्णा आणि सावली येथे अनुसुचित जमातीच्या मुलां-मुलींकरिता नवीन शासकीय वसतिगृहे सुरु करण्यास दि. 8 मार्च, 2019 च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. नवीन 4 वसतिगृहांकरिता आवश्यक 20 नवीन पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सदर वसतिगृहांसाठी शासकीय इमारत सद्यस्थितीत उपलब्ध नसल्यामुळे भाडेतत्वावर इमारती घेण्यात आल्या आहेत. या इमारतीमध्ये फर्निचर व आवश्यक साहित्य उपलब्ध करण्यात आले असून आदिवासी विद्यार्थ्यांनी सावली व पोंभुर्णा येथे प्रवेश घेण्यासंबंधी वर्तमानपत्रात दि. 4 जुलै, 2019 रोजी आवाहन करण्यात आले आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

वसतिगृहांकरिता नवीन इमारतींचे बांधकाम करण्यास्तव तहसील कार्यालय, पोंभुर्णा यांनी चेकहत्तीबोडी येथील जागा उपलब्ध असल्याचे कळविले आहे. या जागेची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर जागा निश्चितीची कार्यवाही पुर्ण करण्यात येईल. सावली येथे शहराजवळ जागा शोधण्याचा प्रयत्न सुरु असून जागा न मिळाल्यास खाजगी जागा विकत घेण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती विभागातर्फे देण्यात आली.

- Advertisement -