Home ताज्या बातम्या पोलिसांना ‘फिटनेस’मंत्र

पोलिसांना ‘फिटनेस’मंत्र

0
पोलिसांना ‘फिटनेस’मंत्र

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

करोनाकाळात १२२ पोलिस गमावलेल्या मुंबई पोलिसांनी या आपत्तीमधून चांगलाच धडा घेतला आहे. पोलिस तंदुरुस्त राहावेत, त्यांना प्रकृतीच्या काळजी कशी घ्यावी याबाबत माहिती मिळावी यासाठी दलामध्ये ‘फिटनेस’ मोहीम हाती घेण्यात आली आहे. याअंतर्गत प्रत्येक पोलिस ठाण्यातील वेगवेगळे आजार असलेल्या, तसेच वयाची ४५ वर्षे ओलांडलेल्या पोलिसांना पहिल्या टप्प्यात सामावून घेतले जाणार आहे. त्यांनी काय खावे, खाऊ नये, कोणता व्यायाम करावा, दिनक्रम कसा असावा, याचे धडे त्यांना सलग तीन महिने देण्यात येणार आहेत. करोनाकाळात सुरुवातीपासून मुंबई पोलिस अहोरात्र सेवा देत आहेत. २०२०मध्ये मुंबई पोलिस दलातील ९९ जणांना करोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर आलेल्या दुसऱ्या लाटेत एप्रिलमध्ये १०, मे महिन्यात १०, जूनमध्ये दोन, तर जुलैच्या पहिल्या आठवड्यात एका पोलिसाला करोनाची लागण झाल्यामुळे प्राण गमवावे लागले. मृत्यू झालेल्या पोलिसांपैकी ९० टक्के पोलिसांना सहव्याधी होत्या. कामाचा ताण, अवेळी जेवण आणि प्रकृतीकडे दुर्लक्ष होत असल्याने पोलिसांमधील आजार बळावत असल्याचे समोर येताच मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पोलिसांच्या आरोग्यासाठी एक मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला. गेल्या आठवड्यात सोमवारपासून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात पूर्व उपनगरांतील पोलिस ठाण्यांना सहभागी करण्यात आले आहे.

Source link