उस्मानाबाद । जिल्हा प्रतिनिधी । १३ जून : बस मध्ये चढताना चोरट्यांनी चोरलेली रक्कम हस्तगत करून फिर्यादीला नुकतीच परत करण्यात आली आहे. जानेवारी महिन्यात घडलेल्या गुन्ह्यातील वीस हजार रुपयांची रक्कम न्यायालयीन निवाड्यानंतर तुळजापूर पोलिसांकडून ज्याची होती त्यांना देण्यात आली आहे.
तुळजापूर तालुक्यातील कुंभारीचे मैनोद्दीन बशीर शेख हे १४ जानेवारी २०२० तुळजापूर येथील नविन बसस्थानक येथे एका बसमध्ये चढत असतांना त्यांच्या विजारीच्या खिशातील २० हजार चोरीस गेले होते. तुळजापूर पोलीस ठाण्यात येथे गुन्हा दाखल आहे. पोलीस तपासात तुळजापूर पोलीसांनी आरोपीच्या ताब्यातून नमूद चोरीची रक्कम जप्त केली होती.
ती रक्कम न्यायालयाच्या आदेशाने मैनोद्दीन बशीर शेख यांना शुक्रवारी १२ जून रोजी पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या हस्ते देण्यात आली. रक्कम परत मिळाल्यामुळे मैनोद्दीन शेख यांनी तुळजापूर पोलीसांचे आभार मानले.