Home गुन्हा पोलीसाच्या घरात चोरट्यांचा डल्ला ; ३ लाखांचा ऐवज लंपास

पोलीसाच्या घरात चोरट्यांचा डल्ला ; ३ लाखांचा ऐवज लंपास

पुणे :  पालखीच्या बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलीसाच्या घरावर चोरट्यांनी डल्ला मारून साडे तीन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. चोरट्यांनी रोख रक्कम आणि दागिने चोरून नेले. ही घटना इंदापूर येथे घडली असून हा प्रकार सोमवारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी अर्जुन नरळे (वय-२८ रा. अंबीका नगर, इंदापूर) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अर्जुन पांडुरंग नरळे हे इंदापूर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल आहेत. ते पत्नीसमवेत अंबिकानगर येथे वास्तव्यास असून २८ जून रोजी सकाळी आठ पासून ते तुकाराम महाराज पालखी बंदोबस्तासाठी तैनात होते. तर त्यांची पत्नी सुट्टीमुळे त्यांच्या मुळगावी गेल्या होत्या. त्यामुळे घर बंद होते. याच संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी घराचे कुलुप तोडून किंमती सामान चोरून नेले.

नरळे यांच्या घराजवळ राहणाऱ्या नागरिकांनी त्यांना फोन करून घटनेची माहिती दिली. नरळे यांनी घरी येऊन पाहिले असता घरातील कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडले होते. चोरट्यांनी कपाटात ठेवलेली ९ हजार ५०० रुपयांची रोकड आणि दागिने असा एकूण साडेतीन लाखांचा ऐवज लंपास केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राम गोमरे करीत आहेत.