पिंपरी : भांडणाची पोलीस तक्रार केल्याचा राग मनात धरून उलटा कोयता पायावर मारून तसेच पेव्हर ब्लॉकने मारहाण करून भावांना जखमी केले. चिंचवडला रामनगर येथे शुक्रवारी (दि. ५) रात्री सव्वानऊच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा देवकर व पवन लष्करे (दोघेही रा. रामनगर) यांच्यासह सात ते आठ अनोळखी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सचिन अंकुश कुसाळकर (वय ३८, रा. रामनगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी सचिन कुसाळकर यांनी भांडणाची पोलिसांकडे तक्रार केल्याचा आरोपींना राग होता. त्यातून आरोपींनी शुक्रवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादी सचिन कुसाळकर यांना शिवीगाळ करून दांडक्याने मारहाण केली. तसेच फिर्यादी कुसाळकर यांचा भाऊ नवीन भोसले यांच्या पायावर आरोपी पवन लष्करे याने उलटा कोयता मारला. यात नवीन भोसले यांचा डावा पाय जखमी झाला. आरोपींच्या सोबत असलेल्या सात ते आठ अनोळखी जणांनी फिर्यादी सचिन कुसाळकर यांचा मावस भाऊ राहुल वेताळे यांना पेव्हर ब्लॉकने मारहाण केली. फिर्यादी सचिन कुसाळकर व त्यांच्या भावास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. तसेच बघून घेण्याची धमकी दिली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.