हायलाइट्स:
- आयपीएल सामन्यांवर सुरू होता सट्टा
- अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यातील बेनोडा येथील प्रकार
- पोलिसांनी टाकली धाड, सात जणांना केली अटक
एलसीबी पथकाने आकाश बाबाराव ब्राम्हणे, मुकुल शंकर गणोरकर, मनीष सुभाषराव खडसे आणि विशाल किसनराव ठाकरे (सर्व रा. जरुड) व अमोल पुंडलिक यावले, मंगेश विजयराव बिजवे, नीलेश साहेबराव वाकोडे (रा. वरुड) या आरोपींना अटक केली आहे. एलसीबीचे पीएसआय सूरज सुसतकर व त्यांचे पथक शनिवारी वरुड परिसरात गस्तीवर होते. त्यावेळी खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. वावरुळी शिवारात मागील काही दिवसांपासून अमोल यावले हा त्याच्या काही सहकाऱ्यांसह एका कारमध्ये आयपीएल सट्टा खेळत आहे, अशी माहिती मिळाली होती. त्यानंतर एलसीबीचे पथक वावरुळी शिवारातील पोल्ट्री फार्म परिसरात गेले. त्यावेळी एका कारमध्ये अमोल यावले व त्याच्यासोबत इतर सहा जण हे आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळताना आढळून आले.
मोबाइलवर इतर व्यक्तींकडून सामन्यातील प्रत्येक चेंडूवर ते सट्टा घेत होते. त्यामुळे पोलिसांनी या सातही जणांना पकडले व त्यांच्याकडून १७ मोबाइल फोन, एक कार, २७ हजार ४५० रुपयांची रोकड, एक दुचाकी व इतर साहित्य असा एकूण १२ लाख ३२ हजार ७० रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई एलसीबीचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सूरज सुसतकर, नीलेश डांगोरे, चेतन दुबे, स्वप्नील तंवर, दीपक सोनाळेकर, युवराज मानमोठे, अमित वानखडे, विनोद हीवरकर यांच्या पथकाने केली.