Home ताज्या बातम्या प्रकल्प काठोकाठ असूनही नागपूर शहराला पाणी कमी मिळणार !

प्रकल्प काठोकाठ असूनही नागपूर शहराला पाणी कमी मिळणार !

0

नागपूर : तोतलाडोह व नवेगाव खैरी प्रकल्प काठोकाठ भरले आहे. त्यानंतरही नागपूर शहराला १० दलघमी पाणी कमी मिळणार आहे. पाण्याचे महत्त्व कळावे व पाण्याची नासाडी कमी व्हावी, या हेतूने महाराष्ट्र जल संसाधन नियोजन प्राधिकरणाने नागपूर शहरासाठी १७२ दलघमी पाणी आरक्षित केले आहे. वास्तविक महापालिकेने १८२ दलघमी पाण्याची मागणी केली होती. जलसंपदा विभागाने पाणी आरक्षणाला मंजुरी दिली आहे. पाणी आरक्षणाची व्यवस्था तात्काळ लागू करण्यात आली आहे. आरक्षण ३१ ऑक्टोबर २०२० पर्र्यत लागू राहणार आहे.
महापालिकेच्या जलप्रदाय विभागाने दिलेल्या माहितीनुसार तोतलाडोह प्रकल्पातून नागपूर शहराला १५२ दलघमी तर कन्हान नदीतून २० दलघमी पाणी मिळणार आहे. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत जल संसाधन नियोजन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाणी वाटपाचा आराखडा निश्चित केला. पाण्याची बचत करावयाची आहे. फक्त १२ महिन्यांचा विचार करून चालणार नाही. भविष्याचा विचार करता पाणी बचत करणे गरजेचे आहे. त्यामुळे गरज लक्षात घेऊन आरक्षण निश्चित केल्याचे रवींद्र ठाकरे यांनी सांगितले.
गेल्या वर्षी महापालिकेने १९३ दलघमी पाण्याची मागणी केली होती. यातील १५५ दलघमी पाणी आरक्षित ठेवण्यात आले होते. परंतु उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची मागणी वाढली होती. तोतलाडोतील मृत साठ्यातील पाणी उचलण्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवानगी दिली होती. त्यामुळे शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला होता. महापालिकेने १७०दलघमी पाणी उचलले होते. नागपूर शहराला दररोज ६४० ते ६६० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो.

तोतलाडोहात ९९.२२ टक्के साठा
शहरासाठी मर्यादित पाणी आरक्षण ठेवले आहे. परंतु तोतलाडोह प्रकल्पात सध्या ९९.२२ टक्के जलसाठा आहे. नवेगाव खैरी प्रकल्पात ७६.२४ टक्के जलसाठा आहे. तोतलाडोह प्रकल्पाची एकूण क्षमता ११६६.९३ दलघमी आहे. सध्या प्रकल्पात ११५८ दलघमी पाणी आहे. नवेगाव खैरी प्रकल्पाची साठवण क्षमता १८०.९८ दलघमी असून सध्या या प्रकल्पात १४७.२५ दलघमी जलसाठा आहे. गेल्या वर्षी या कालावधीत तोतलाडोह प्रकल्पात १३.१ टक्के तर नवेगाव खेरी प्रकल्पात ३९.५८ टक्के साठा होता.