“आम्ही काँग्रेसला 144 जागांची ऑफर दिली आहे आणि त्यांच्या निर्णयाची वाट पाहतो आहोत. प्रतिसाद आला किंवा नाही आला तरी ‘MIM’ सोबत आमचा निर्णय घेऊन टाकू. 31 ऑगस्ट पर्यंत ठरवून टाकू,” असं म्हणत ‘वंचित बहुजन आघाडी’ चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेसला डेडलाईन दिली आहे.
‘बीबीसी मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आतापर्यंत आघाडी न होण्यासाठी काँग्रेसला जबाबदार धरताना ‘एकाधिकारशाहीच्या विरोधात धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र यायला हवं,’ असंही म्हटलं आहे.
पाहा संपूर्ण मुलाखत –
“आमची सगळ्यांचीच पहिल्यापासून इच्छा होती की काँग्रेससोबत युती व्हावी. पण काँग्रेसने कधीच तसा प्रयत्न केला नाही.लोकसभेच्या निवडणुकीत तेच झालं. उलट त्यांनी आम्हाला ‘बी टीम’ ठरवलं. आज त्यांनीच म्हटलं की एकत्र यायला हवं. आम्ही म्हणालो की एकत्र यायला आमचा नकार नाही. 50-50 टक्के जागा, असा आकडाही देऊन टाकला. आता 31 तारखेला आम्ही आमचा निर्णय घेऊन टाकू,” आंबेडकर म्हणाले.
वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेसला मतांमध्ये तोटा होतो आणि एकत्र येण्यासाठी काँग्रेसला तिष्ठत ठेवण्याचं राजकारण होतं, या होणाऱ्या आरोपांवर विचारल्यावर प्रकाश आंबेडकर आक्रमक झाले. “माध्यमं वंचितांच्या विरोधात आहेत. आम्ही काँग्रेसला हरलेल्या जागा मागितल्या. लेखक, विचारवंत म्हणतात की आम्ही काँग्रेसशी खेळ करतो. मीडिया काँग्रेसच्या बाजूने आहे,” असं ते म्हणाले.
पण त्याच वेळेस या मुलाखतीत ते काँग्रेसला इशारा देतात की त्यांना निर्णय घेण्यापासून कोणी रोखू शकत नाही. ते भाजपकडे पण जाऊ शकले असते, पण ठरवून गेले नाहीत, असं सांगतात.
“प्रयत्न करत राहणं आमचं काम आहे. एकाधिकारशाहीविरोधात आमचा लढा कायम राहणार. आम्ही आमचे बाप. आम्हाला कुणी थांबवलंय भाजपकडे जाण्यापासून. आम्हीच थांबलेलो आहोत. आम्ही सहज भाजपसोबत जाऊ शकतो. आम्ही स्वतःहून ठरवलंय की जायचं नाही. त्याची सगळ्यांनी कदर करावी,” आंबेडकर म्हणाले.
दुसरीकडे, ‘MIM’ सोबतही जागावाटपावरून ‘वंचित’ मध्ये वाद आहेत आणि त्यामुळेच निर्णयाला उशीर होतोय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पण प्रकाश आंबेडकरांनी असे कोणतेही वाद नाहीत, असं म्हटलं आहे. पण चर्चा फक्त असदुद्दिन ओवेसींशीच होईल, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं.
काही दिवसांपूर्वी ‘एमआयएम’चे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी 100 जागांची मागणी केली होती.
“असदुद्दीन ओवेसींशीच बोलणी होणार. इतर कुणाशी होणार नाही, असं ठरलंय. माझं आणि त्यांचं बोलणं सुरू आहे. तिथे अडचणी नाहीत. मी ओवेसींशी फोनवरून बोललो. त्यांच्यात आणि माझ्यात चांगलं अंडरस्टँडिंग आहे. आमच्या काही प्रॉब्लेम नाही. मी हैद्राबादला जाणार आहे. त्यांच्या घरी दावतलाही जाईन. आमच्यात फायनल आहे, हे लक्षात घ्या. पक्षाध्यक्ष जे सांगतील ते महत्त्वाचे. काही नेते स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी स्टेटमेंट करतात. लोअर लेव्हलवर जे बोलतात, ते मी गृहित धरत नाही,” असं आंबेडकर यावेळी म्हणाले.
राज ठाकरेंची ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत आघाडीत जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. जर ‘वंचित’ काँग्रेसशी बोलणी करते आहे तर त्यांना ‘मनसे’ सोबत जाणं मान्य आहे का, असं विचारल्यावर प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट नकारात्मक उत्तर दिलं.
“आम्ही मनसेसोबत जाणार नाही. आम्ही राष्ट्रवादी आहोत. आमचा ना धार्मिक लुकआऊट आहे ना प्रादेशिक. आम्ही मनसेसोबत जाऊ शकत नाही,” असं आंबेडकर म्हणाले.