Home शहरे मुंबई प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवरच दहशतवाद्यांना जेरबंद केल्याच्या बातम्या येतात : शिवसेना

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवरच दहशतवाद्यांना जेरबंद केल्याच्या बातम्या येतात : शिवसेना

0

मुंबई : प्रजासत्ताक दिनी हल्ले करण्याचा कट तूर्त तरी कश्मीर पोलिसांनी उधळला आहे. आता लवकरच आणखी एक बातमी दिल्लीच्या दिशेने सरकेल ती म्हणजे, दिल्लीतील प्रजासत्ताक दिनावर हल्ला करण्यासाठी घुसलेल्या चार-पाच सशस्त्र अतिरेक्यांना अटक केली. पंतप्रधान मोदी यांच्यावरही हल्ला करण्याचा त्यांचा कट होता. तो उधळला गेला, अशा बातम्यांचे नवल आता कुणाला राहिलेले नसल्याचे म्हणत सामनामधून शिवसनेने सरकावर निशाणा साधण्यात आला आहे.

स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिनाचे सोहळे आले की, अतिरेकी बॉम्ब-बंदुका घेऊन बिळातून बाहेर पडतात. कॅलेंडर घेऊनच ते बिळात पडलेले असतात व राष्ट्रीय सोहळय़ांच्या तारखा पाहून बाहेर पडतात. मग ते बाहेर पडले की, त्यांचे कट कसे उधळून लावले अशा बातम्या प्रसिद्ध होतात. हे गेली कित्येक वर्षे सुरू असल्याचा टोला सामनामधून सरकारला लगावला आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांना जेरबंद करणे ही प्रत्येक वर्षी होणारी कारवाई आहे. आताही ते पुन्हा पकडले गेले आहेत आणि कश्मीर तसेच राजधानी दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याचा कट उधळला गेला आहे. दिल्लीचाच नव्हे तर कश्मीर खोऱ्यात फडकणारा प्रत्येक तिरंगा सुरक्षित राहिला पाहिजे, असेही सामनातून शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे.

तर कश्मीरात सीमेपलीकडून घुसखोरी होत आहे, पण कश्मीरातील दहशतवाद्यांना सुखरूप सीमेपलीकडे नेण्यासाठी पोलीस यंत्रणेचा वापर होत आहे व त्याकामी राष्ट्रपती पदक विजेते पोलीस उपअधीक्षकच आता पकडले गेले आहेत. पोलिसांचा वापर करून कश्मीरात सरकार काही वेगळे उद्योग करीत होते. त्यामुळे ‘पुलवामा’ हल्ल्याबाबत कोणी संशय व्यक्त केला तर देशाचे गृहमंत्रालय काय उत्तर देणार ? असा प्रश्न सुद्धा सामनामधून उपस्थित करण्यात आला आहे.