Home ताज्या बातम्या प्रताप सरनाईक यांची युतीची हाक; भाजपनं लगेचच साधली संधी

प्रताप सरनाईक यांची युतीची हाक; भाजपनं लगेचच साधली संधी

0
प्रताप सरनाईक यांची युतीची हाक; भाजपनं लगेचच साधली संधी

हायलाइट्स:

  • प्रताप सरनाईक यांच्या पत्रामुळं राजकीय वर्तुळात खळबळ
  • भाजपशी पुन्हा जुळवून घेण्याची पक्षप्रमुखांकडं केली विनंती
  • सरनाईक यांच्या मागणीवर चंद्रकांत पाटील यांची दिली प्रतिक्रिया

मुंबई: शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेलं पत्र समोर आल्यामुळं राजकीय वर्तुळात सध्या खळबळ उडाली आहे. युतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये अजूनही उत्तम संबंध आहेत. ते तुटण्याआधी भाजपशी पुन्हा जुळवून घ्या, अशी मागणी सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांकडं केली आहे. सरनाईक यांच्या भूमिकेवर सर्वच पक्षांकडून प्रतिक्रिया येत आहेत. भारतीय जनता पक्षानं या निमित्तानं संधी साधत अप्रत्यक्षपणे शिवसेनेला साद घातली आहे. (Chandrakant Patil on Pratap Sarnaik Letter)

वाचा: शिवसेनेतून पुन्हा युतीची हाक; आमदाराच्या पत्रामुळं खळबळ

‘सरनाईक यांच्या मतावर आम्ही बोलणं बरोबर नाही’ असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपलं मत बोलून दाखवलं आहे. ‘प्रताप सरनाईक हे शिवसेनेचे नेते, आमदार आहेत. त्यांनी आपल्या पक्षप्रमुखांना, उद्धव ठाकरे यांना भाजपशी जुळवून घेण्याची विनंती केलीय. उद्धवजींनी त्यावर विचार केला तर आमचे वरिष्ठ नेतेही त्याबाबत विचार करतील,’ असं सूचक वक्तव्य पाटील यांनी केलं आहे.

वाचा:सरनाईक यांच्या पत्रावर संजय राऊत म्हणाले, तो मुद्दा महत्त्वाचा!

‘सरनाईक यांनी आता जी मागणी केलीय, तेच आम्ही १९ महिन्यांपूर्वी घसा फोडून सांगत होतो. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सोबत शिवसेनेनं जाऊ नये. ही आघाडी अनैतिक आहे असं आमचं म्हणणं होतं. अल्पसंख्याकांचं लांगूलचालन हीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची बेसिक थिअरी आहे. शिवसेनेचा त्याला विरोध होता. त्यावरच शिवसेना वाढलीय. सरनाईक यांनी हेच सांगितलंय. त्यांनी व्यक्त केलेलं मत ही सच्चा शिवसैनिकाची भावना आहे. पण तेच आम्ही सांगितलं तर आमच्यावर टीका होते,’ असं पाटील म्हणाले.

काँग्रेस म्हणते…

प्रताप सरनाईक यांनी लिहिलेल्या पत्रावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. ‘तो शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. आमचा त्याच्याशी काही संबंध नाही. त्यामुळं काँग्रेसनं त्यावर मत व्यक्त करण्याची आवश्यकता नाही,’ असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

वाचा: नागपूर जेलमध्ये हाणामारी; एका कैद्याने कापडात दगड बांधला आणि…

Source link