अमरावती, दि. 26 : भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना घटनात्मक अधिकार दिले आहे. संविधान प्रत्येक भारतीयासाठी महत्त्वाचे आहे, त्यामुळे संविधानाचे प्रत्येकाने वाचन करावे, असे आवाहन उद्योग, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी केले.
जवाहरलाल नेहरू स्टेडीयम येथे 76 वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, विशेष पोलिस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर आदी उपस्थित होते.
श्री. नाईक म्हणाले, स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाने देश स्वतंत्र झाला. त्यानंतर भारतीय संविधानाच्या रूपाने देशाला अमूल्य देणगी मिळाली आहे. संविधानामुळे प्रत्येक नागरिकाला अधिकार मिळाला असल्यामुळे प्रत्येकाने संविधानाचे वाचन करावे. संविधानाचा आदर राखून राज्य शासन विविध घटकांसाठी कार्य करीत आहे. शेतकऱ्यांना वेळेवर आणि वाजवी दरात बियाणे, खते उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच केवळ एक रूपयात विमा काढण्यात आला आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगामात 1464 कोटी, तर रब्बीमध्ये 148 कोटी रूपये वितरीत करण्यात आले आहे.
कृषीसाठी वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतून जिल्ह्यात 840 एकर शासकीय जमिनीवर सौर प्रकल्प उभारणी करण्यात येत आहे. यातून 184 मेगावॅटचे सौर प्रकल्प उभारण्यात येत आहे. प्रधानमंत्री सुर्यघर मोफत योजनेतून 78 हजार रूपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे. जिल्ह्यातील पानपिंपळी आणि हरभरा पिकांना जीआय मानांकन प्राप्त झाले आहे.
महिलांना बचतगटाच्या माध्यमातून स्वयंपूर्ण करण्यात येत आहे. बचतगट उत्पादित वस्तूंच्या ब्रँडींग, पॅकेजिंगवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. जिल्ह्यातील 600 महिलांना रोजगाराचे साधन देऊन स्वयंपूर्ण बनविण्यासाठी अनुदानावर पिंक ई-रिक्षा देण्यात येणार आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ 7 लाख महिलांना होत आहे. 99 टक्क्याहून अधिक महिलांना योजनेचा लाभ मिळत आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून 5 हजार युवकांना 14 कोटी रूपयांचे विद्यावेतन देण्यात आले आहे. तसेच नांदगावपेठ अतिरिक्त एमआयडीसीमध्ये टेक्सटाईल्स पार्क निर्माण करण्यात आला आहे. याठिकाणी 13 मोठे उद्योग सुरु झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
सुरवातीला ध्वजरोहनानंतर श्री. नाईक यांनी परेडचे निरीक्षण केले. सामाजिक न्याय विभागातर्फे संविधानाची प्रत आणि उद्देशिकेची भेट त्यांना देण्यात आली. यावेळी पोलिस, होमगार्ड, राष्ट्रीय छात्र सेना, स्काऊट गाईड पथक यांनी संचलन केले. यावेळी सामाजिक न्याय विभाग, महिला व बालविकास विभाग, कौशल्य विकास विभाग, जलद प्रतिसाद पथक, दामिनी पथक, अग्निशमन,परिवहन महामंडळ, श्वान पथक, शिवाजी संस्था, सामाजिक वनीकरण आदी विभागांच्या चित्ररथाने संचलन केले. मान्यवरांनी ॲग्रीस्टॅक चित्ररथाला हिरवी झेंडी दाखविली. तसेच खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या खासदार निधीतून दिव्यांगांना तीनचाकी वाहनाचे वाटप करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
प्रजासत्ताक दिनी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा गौरव
जिल्ह्यात विविध क्षेत्रात कार्यरत आणि उल्लेखनीय यश मिळविणाऱ्यांचा राज्यमंत्री इंद्रनिल नाईक यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. जवाहरलाल नेहरू स्टेडीयम येथील प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्यात हा कार्यक्रम पार पडला.
जिल्ह्यातील सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनासाठी प्रयत्न करून 126 टक्के निधी संकलित केल्याबद्दल जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचा सत्कार करण्यात आला. जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त प्रा. डॉ. योगेश निर्मळ यांच्या वतीने त्यांच्या पत्नी अपर्णा निर्मळ यांनी पुरस्कार स्विकारला. प्रवीण आखरे यांना जिल्हा क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालयातील जनसंपर्क अधिकारी मिलिंद तायडे, योगेश पानझाडे, स्वच्छ भारत अभियानांतर्गत नगरविकास शाखेचे सहआयुक्त सुमेध अलोणे, महसूल सहायक एस. एम. काशीकर, सहायक ग्रंथालय संचालक डॉ. राजेश पाटील, डॉ. सुरजकुमार मडावी, पोलीस विभागातील राम नागे, इक्बाल सैय्यद, सॉफ्टबॉल खेळाडू सौरभ टोकसे, जिम्नॅस्टिक हिमांशू जैन, वुशु क्रीडा प्रकारासाठी वैष्णवी बांडाबुचे, मध्यवर्ती कारागृह शिपाई सुधाकर मालवे, ॲग्रीस्टॅक प्रकल्पातील रमेश खुलसांजे, मिथून अंबाडकर, रमेश माहेकर, पंकज चकुले, सिद्धार्थ खडसे, मधुकर अंबाडकर, नाना यमगर, गजानन भुरे, प्रविण मेंढे, चंदन दातीर, रामराव इंगोले यांना गौरविण्यात आले.
00000