घर असावे घरासारखे
नकोत नुसत्या भिंती
तिथे असावा प्रेम जिव्हाळा
नकोत नुसती नाती…
ही नाती घरात एकोप्याने नांदण्यासाठी स्वतःचे हक्काचे घर असायला हवे. असे प्रत्येकाचे स्वप्न असते. हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी ‘प्रधानमंत्री आवास योजना’ आणि ‘राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना’ केंद्र आणि राज्य शासनामार्फत ग्रामीण विकास यंत्रणा या विभागामार्फत ग्रामीण भागात राबविल्या जातात. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात साधारणपणे १० हजार घरं प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य पुरस्कृत घरकूल योजनेमधून बांधण्यात आल्याने ह्या दोन्ही योजनांची यशस्वी अंमलबजावणी होताना दिसत आहे. परिणामी वस्त्या, तांड्या-पाड्यांवरची मातीची, कुडाच्या झोपड्यांचे रूपांतर आता सिमेंटी पक्क्या घरात होऊ लागले आहे. त्यामुळे ऊन वाऱ्यापासून बचाव आणि पावसाळ्यात विंचू सापाच्या दंशाची शक्यता कमी झाली आहे. असं सुरक्षित हक्काचं छप्पर
शासनाच्या आवास योजनेतून मिळत असल्याने माणसाची निवारा ही मूलभूत गरज पूर्ण होत आहे. असा प्रकारे सर्वासाठी घरे २०२२ या शासनाच्या धोरणाचा हेतू साध्य होत आहे.
ग्रामीण भागासाठी अनेक वर्षांपासून आवास योजना सुरू आहे. टप्याटप्याने या योजनांमध्ये सकारात्मक बदल होत गेले. सामाजिक वंचित घटक आणि आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबाचा सर्व्हे करून पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. चार टप्प्यात १ लाख २० हजाराची रक्कम घराच्या बांधणीसाठी अनुदान स्वरुपात दिली जातो. शिवाय शौचालय उभारणीसाठी प्रोत्साहनपर १२ हजार रुपयांचे अनुदान व महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत मजुरीच्या रूपाने साधारण रुपये वीस हजार रुपयांचा निधी लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केला जातो. ही योजना जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर, कल्याण, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ या पाच तालुक्यातील ग्रामीण आदिवासी भागात राबवली जात आहे.
जिल्हाच्या ग्रामीण भागात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेसाठी 2016-17 ते 2020-21 अंतर्गत 6720 उद्दिष्ट प्राप्त झाले असून, त्यामध्ये 6696 लाभार्थी मंजूर झाले आहेत. त्यापैकी 6362 घरे पूर्ण झाली आहेत. तसेच आवास प्लस अंतर्गत 2821 लक्षांक प्राप्त झाले, त्यापैकी 1596 लाभार्थी मंजूर झाले, उर्वरित 1225 मंजूरी प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. राज्य पुरस्कृत आदिम आवास योजना, रमाई आवास योजना आणि शबरी आवास योजना अंतर्गत 2016-17 ते 2021-22 4716 लक्षांक प्राप्त झाले, त्यातून 4242 मंजूर झाले असून 3289 घरे पूर्ण झाली आहेत. उर्वरित ९५३ घरे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार आहेत.
या केंद्र आणि राज्य पुरस्कृत घरकुल योजनांना गतिमान करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून २० नोव्हेंबर २०२० ते ५ जून २०२१ कालावधीत महा आवास अभियान राबविण्यात आले. या अभियानाची जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेने ग्रामीण भागात यशस्वी अंमलबजावणी केल्याने प्रधानमंत्री आवास योजनेच्या ‘सर्वोत्कृष्ट जिल्हा’ या पुरस्कार गटात जिल्हा परिषदेला ‘तिसरा’ तर ‘सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारत’ या पुरस्कार गटात ‘भिवंडी तालुक्यातील ‘चिचवली ग्रामपंचायतीस प्रथम’ पुरस्कार जाहीर झाला. विशेष म्हणजे या अभियान काळात पहिल्या टप्प्यात ३९ भूमिहीन कुटुंबाला हक्काची जागाही उपलब्ध करून देण्यात आली. तर दुसऱ्या टप्प्यात १५ भूमीहिन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्याबाबत पाठपुरावा चालू आहे. या अभियान काळात डेमो हाऊस, घरकुल मार्टची उभारणी तसेच लाभार्थ्यांचे मेळावे आयोजित करून अभियानाबाबत जागृतीही करण्यात आली. त्याचबरोबर प्रत्येक घराच्या भिंतीवर वारली चित्र रेखाटण्यात आली. तर काही गावांमधील घरांच्या भींती एकसारख्या रंगाने रंगविण्यात आल्या.
आवास योजना गतिमान करून गरिबांच्या घराची स्वप्नपूर्ती व्हावी म्हणून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प संचालक छायादेवी सिसोदे आणि त्यांची टीम अहोरात्र मेहनत घेत आहे. सातत्याने क्षेत्रभेटी करून कामांना गती देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य पुरस्कृत घरकूल योजनांमुळे आमच्या कुटूंबाना सुरक्षित आणि हक्काचे घर मिळाल्याची भावना नागरिक व्यक्त करतात.
– पंकज चव्हाण
जनसंपर्क अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे