Home बातम्या ऐतिहासिक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौरा तयारीचा पालकमंत्र्यांकडून आढावा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौरा तयारीचा पालकमंत्र्यांकडून आढावा

0
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौरा तयारीचा पालकमंत्र्यांकडून आढावा

यवतमाळ, दि.२२ (जिमाका) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दि.२८ फेब्रुवारी रोजी शहरानजीक भारी येथील मैदानावर गटाच्या महिलांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने पालकमंत्री संजय राठोड यांनी आज तयारीचा आढावा घेतला. मेळावा उत्तमपणे पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

महसूल भवन येथे आयोजित बैठकीला खा.भावना गवळी, आ.डॉ. अशोक उईके, आ.संजीवरेड्डी बोदकुरवार, आ.इंद्रनील नाईक, जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, पोलिस अधीक्षक डॉ.पवन बन्सोड, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत, बांधकामचे अधीक्षक अभियंता संभाजी धोत्रे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या तयारीसाठी प्रशासनाच्यावतीने विविध प्रकारच्या ३० समित्या तयार करण्यात आल्या आहे. या समितीच्या प्रमुखांकडून पालकमंत्र्यांनी तयारीचा आढावा घेतला. मेळाव्यासाठी जिल्हाभरातून येणाऱ्या महिलांची प्रवास, बैठक, पाणी व्यवस्था उत्तमपणे होणे आवश्यक आहे. परिसरात स्वच्छतागृह पुरेशा प्रमाणात उभारण्यात यावे. येथे येणाऱ्या महिलांच्या गर्दी व्यवस्थापनासह स्टेज, मंडप, वाहनतळ, सुरक्षा आदींचा देखील पालकमंत्र्यांनी आढावा घेतला.

भारी येथे ४२ एकरच्या खुल्या जागेत हा मेळावा होणार आहे. त्यासाठी मैदानात २६ एकर जागेवर भव्य मंडप उभारण्यात येत असून उभारणीच्या कामाला गती आली आहे. जिल्हाभरातून येणाऱ्या महिलांसाठी बसेसची व्यवस्था प्रशासनाच्यावतीने करण्यात आली आहे. त्यासाठी बसनिहाय समन्वयक व तालुका स्तरावर संपर्क अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी सांगितले.

यावेळी सर्व समिती प्रमुख अधिकारी यांनी आपल्याकडे सोपविलेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा सादर केला. संबंधित अधिकारी यांनी आपआपली जबाबदारी चोखपणे पार पाडून मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.

000