मुंबई. दि. २४ : महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयामार्फत मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त प्रभादेवी, मुंबई येथील करिष्मा सभागृहात ‘माय मराठी अभिजात मराठी’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
प्रास्तविकात भाषा संचालक विजया डोनीकर यांनी भाषा संचालनालयाची महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासूनच भूमिका व भविष्यातील दिशा त्याचबरोबर यावर्षीच्या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त भाषा संचालनालय ‘मराठी भाषा : रोजगाराच्या संधी’ हे आशयसूत्र घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर ‘३६ जिल्हे ३६ मार्गदर्शन सत्रे’ हा आगळा-वेगळा उपक्रम राबवीत असल्याचेही सांगितले.
त्यानंतर डॉ.अपर्णा बेडेकर यांनी संत साहित्यातील मराठीचा भाषिक अंगाने मागोवा घेतला. संगीतकार कौशल इनामदार यांनी संगीत कलेच्या अंगाने मराठी भाषेच्या संबंधातून भाषिक विकासाचा पट प्रेक्षकांसमोर उलगडला. कवी प्रवीण दवणे यांनी अभिजात मराठीच्या संवर्धनासाठी विविध उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे सांगितले. भावगीते व अभंग शार्दुल कवठेकर व संजना अरुण यांनी सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री प्रधान यांनी केले.
कार्यक्रमाचे सादरीकरण हे उत्तरा मोने यांच्या मिती ग्रुपमार्फत करण्यात आले. सहायक भाषा संचालक संतोष गोसावी यांनी आभार मानले.
0000
संध्या गरवारे/विसंअ