
मुंबई, दि. २६ : भारतीय प्रशासकीय सेवेत आता अनुभवी डॉक्टर्स, इंजिनीअर्स आदी व्यावसायिक येत आहेत, ही समाधानाची बाब आहे. मोठी उमेद व अपेक्षांसह युवा अधिकारी नागरी सेवेत रुजू होत आहेत. अधिकाऱ्यांनी कल्याणकारी योजनांचे लाभ समाजातील अंतिम व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करावा. अधिकाऱ्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील ब्रिटिश नोकरशाहीचे अनुकरण करू नये, अशी सूचना राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी अधिकाऱ्यांना केली.
भारतीय प्रशासकीय सेवेच्या २०२५ च्या तुकडीतील आठ परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची महाराष्ट्र लोकभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
अधिकाऱ्यांनी सेवाभावी वृत्ती व पोटतिडकीने काम करण्याची अंतःप्रेरणा सोडू नये, असे सांगताना भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू होत असलेले युवा अधिकारी विकसित भारताचे तसेच अंत्योदयाचे ध्येय साध्य करण्यास महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी शासनाचे अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी यांनी युवा भाप्रसे अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाची माहिती दिली, तर शोभिका पाठक व डॉ. पंकज पटले या परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी प्रशिक्षणाचे अनुभव कथन केले. राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी प्रास्ताविक केले.
००००

WhatsApp