Home ताज्या बातम्या प्रशासनाने सतर्क राहून युद्धपातळीवर उपाययोजना कराव्यात- विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय – महासंवाद

प्रशासनाने सतर्क राहून युद्धपातळीवर उपाययोजना कराव्यात- विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय – महासंवाद

0
प्रशासनाने सतर्क राहून युद्धपातळीवर उपाययोजना कराव्यात- विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय – महासंवाद

       अमरावती, दि. २७ : गेल्या काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे विभागातील सर्वच जिल्ह्यांत कमी-अधिक प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. या पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच आगामी काळात पावसाचा अंदाज पाहता जिल्हा प्रशासनाने सतर्क राहून युध्दपातळीवर उपाययोजना कराव्यात. त्यासाठी बाधित क्षेत्रात प्रत्यक्ष क्षेत्रभेटी देऊन तेथील नागरिकांच्या समस्या संवेदनशिलतेने सोडवाव्यात, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

अकोला जिल्ह्याच्या मुर्तिजापूर तालुक्यातील खरब ढोरे या पुरग्रस्त गावाला विभागीय आयुक्तांनी आज भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर विभागातील पाचही जिल्ह्यांचा पूरपरिस्थितीचा आढावा डॉ. पाण्डेय यांनी दुरध्वनीच्या माध्यमातून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

डॉ. पाण्डेय म्हणाल्या की, जिल्ह्यातील ज्या भागातून आपत्तीची माहिती मिळेल, त्या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणेने तात्काळ पाहोचून नागरिकांना मदत आणि दिलासा देणे आवश्यक असून त्याप्रमाणे कार्यवाही करावी. पुर येणाऱ्या भागात उंच ठिकाणी तात्पुरते निवारे बांधून नागरिकांची निवासाची व भोजनाची व्यवस्था करावी. त्याठिकाणी औषधींचा पुरवठा व पिण्याचे शुध्द पाणी उपलब्ध करुन द्यावे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने रबरी बोट, लाईफ जॅकेट्स तसेच आवश्यक साहित्य, उपकरणांसह मदतीसाठी सतर्क रहावे. आपल्या जिल्ह्यातील नदी काठावरील, दुर्गम व पुरपरिस्थिती निर्माण होऊ शकणाऱ्या गावातील नागरिकांच्या सतत संपर्कात राहावे. त्यांच्याकडून नुकसानबाबत तसेच नैसर्गिक आपत्ती संदर्भात माहिती जाणून घ्यावी. बांधितांचे प्रश्न व समस्यांचे संवेदनशिलतेने सोडवाव्यात, अश्या सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.

त्या पुढे म्हणाल्या की, ज्या क्षेत्रात शेतीचे नुकसान, मालमत्तेची हानी झाली असेल तेथील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाईचे प्रस्ताव शासनाला सादर करण्यात यावे. तसेच या काळात सर्व यंत्रणांनी आपआपसात समन्वय ठेऊन कुठल्याही आपदा परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सतर्क राहावे. जिल्ह्यातील सामाजिक संस्थांची सुध्दा अशावेळेस मदत घ्यावी. आपदा परिस्थिती उद्भवल्यास त्यावर तात्काळ उपाययोजना व प्रतिसाद देण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी मुख्यालयीच उपस्थित राहावे, अशा सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या.

ज्या ठिकाणी अधिकचा पाऊस आहे, तेथे एनडीआरएफ, एसडीआरएफ चमू आवश्यकतेनुसार सज्ज ठेवाव्यात आणि कोणत्याही स्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासनाची संपूर्ण सज्जता ठेवावी, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले. पुढच्या काळात पाऊस अधिक पडण्याची शक्यता असलेल्या भागात नागरिकांना तातडीने आणि नियमितपणे विविध माध्यमातून अलर्ट द्यावेत. मानवी चुकीमुळे शेतीचे नुकसान होणार नाही, यादृष्टीने सुद्धा काळजी घ्यावी. विभागातील पाचही जिल्ह्यात झालेल्या पर्जन्यमानाचा आढावा विभागीय आयुक्तांनी यावेळी घेतला.