टॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री व दिग्दर्शिका विजया निर्मला यांचे हैदराबादमध्ये निधन झाले. त्या ७३ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात नवरा कृष्णा व मुलगा नरेश असा परिवार आहे. यांच्या शिवाय महेश बाबू व मंजुला घट्टामनेनी ही सावत्र मुलेदेखील आहेत. विजया निर्मला यांच्या निधनाची बातमी त्यांचा मुलगा नरेश यांनी ट्विटरवर दिली. त्यांचे पार्थिव नानकरामगुडा येथील त्यांच्या घरी आणण्यात आले असून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी महेश बाबू व त्याची पत्नी नम्रता शिरोडकर हिनेदेखील श्रद्धांजली वाहिली.
नरेश यांनी ट्विट केलं की, मला सांगताना खूप वाईट वाटतंय की माझी आई, ज्येष्ट अभिनेत्री व प्रतिष्ठित निर्माती-दिग्दर्शिका डॉ. ए.जी.विजया निर्मला यांचे आज निधन झाले. टॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. विजया निर्मला १९६४ साली प्रदर्शित झालेल्या मल्याळम चित्रपट भार्गवी निलयममधून प्रसिद्ध झाल्या होत्या. एक महिला निर्मातीने जास्त चित्रपटांचे दिग्दर्शन केल्यामुळे त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे. वयाच्या सातव्या वर्षांपासून त्या बालकलाकार म्हणून काम करत होत्या. २००८ साली त्यांना तेलगू सिनेमासाठी दिल्या जाणाऱ्या रघुपीठ वेंकैया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी जवळपास २०० हून अधिक तेलुगू, तमीळ व मल्याळम सिनेमात काम केले आहे. याशिवाय ४० हून अधिक चित्रपटाचे दिग्दर्शन केेले आहे.