मागच्या वर्षी मालिकांचे नवे भाग प्रसारित होत नसताना ओटीटी या माध्यमानं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्यामुळे बराचसा प्रेक्षक ओटीटीकडे वळला. कालांतरानं चित्रीकरण सुरू झाल्यानंतर मालिकांचं चक्रही सुरळीत झालं. त्यानंतर मात्र टीव्हीविश्वासमोर आव्हान होतं प्रेक्षकांना पुन्हा एकदा मालिकांकडे वळवण्याचं. वेब सीरिज, ओटीटीवर प्रदर्शित होणारे सिनेमे या स्पर्धेत टिकून राहाण्यासाठी अधिकाअधिक चांगल्या कलाकृती आणणं हे टीव्ही माध्यमासाठी मोठं आव्हान ठरलं. याच हेतूनं विविध वाहिन्यांनी शक्कल लढवत प्राइम टाइमची वेळ वाढवली आहे, असं टीव्हीविश्वातील काही तज्ज्ञांनी सांगितलं. ही वेळ वाढवणं नवीन नसलं तरी सध्या ते प्रकर्षानं जाणवत आहे. कारण अनेक ज्येष्ठ आणि प्रस्थापित कलाकार छोट्या पडद्यावर दिसताहेत.
प्राइम टाइम स्लॉट म्हणजे सर्वाधिक प्रेक्षकवर्ग मिळणारा कालावधी. छोट्या पडद्यावर सर्वसाधारण प्राइम टाइमचे तास म्हणजे संध्याकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत असतात. याच वेळेत घरोघरी सर्वाधिक टीव्ही पाहिला जातो. परंतु, आता प्राइम टाइमचं गणित बदललं आहे. लॉकडाउनच्या दिवसात देशभरातील सर्व लोक (टीव्ही प्रेक्षक) दिवसभर घरी होते. आजच्या तारखेलाही अनेक जण वर्क फॉर्म होममुळे घरीच आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी आणि त्यांचं मनोरंजन करण्यासाठी टीव्ही वाहिन्या नव्या मालिका घेऊन येत आहेत. परिणामी त्यांनी प्राइम टाइमदेखील वाढवला आहे. तो आता साधारणपणे संध्याकाळी ६ ते रात्री ११ इथवर पोहोचला आहे, असं जाणकारांनी सांगितलं. या वाढलेल्या प्राइम टाइममुळे सध्या मराठी टीव्हीविश्वातील मालिका आणि कथाबाह्य कार्यक्रमांची एकूण संख्या ३०च्या आसपास गेली आहे.
रविवार टीव्हीचा प्रयोगाचा
सध्या पुरस्कार सोहळे किंवा अन्य कार्यक्रम होत नसल्यामुळे रविवारी रात्री काय दाखवावं असा प्रश्न वाहिन्यांना पडला आहे. काहीना काही प्रयोग करत राहण्याचा पण केलेल्या वाहिन्यांनी या रविवारकडे संधी म्हणून बघायचं ठरवलं आहे. काही वाहिन्यांनी दर रविवारी एक महाएपिसोड असं केलंय; तर काहींनी एकच कार्यक्रम दोन तास दाखवायला सुरूवात केलीय. ‘नवे लक्ष्य’ हा कार्यक्रम आता दर रविवारी प्रसारित केला जातो. तर प्रेक्षकांना खळखळून हसवणारा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम रविवारी दोन तास दाखवला जातो. काही वाहिन्यांवर ‘वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर’ या अंतर्गत काही सिनेमे दाखवले जाताहेत तर काही वेळा जुने गाजलेले कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येताहेत.