हायलाइट्स:
- अभिनेत्री अनुष्का शर्मानं हाती घेतला आगळा वेगळा उपक्रम
- प्रेग्नन्सी काळातील कपडे विकून अनुष्का शर्मा वाचवणार पाणी
- व्हिडीओ शेअर करत अनुष्कानं दिली तिच्या नव्या उपक्रमाची माहिती
अनुष्का शर्मानं तिच्या प्रेग्नन्सीच्या काळात वापरलेले स्टायलिश आणि फॅशनेबल कपडे ऑनलाइन विकण्याचा निर्णय घेतला आहे. यातून मिळणारे पैसे ती स्नेहा मातृत्व सुरक्षा या एनजीओला देणार आहे. यासोबतच यातून पर्यावरण संरक्षणही होणार आहे. अनुष्कानं हाती घेतलेल्या या उपक्रमातून २.५ लाख लीटर पाण्याची बचत होणार आहे. हा विचार आपण प्रेग्नन्सीच्या वेळीच केला होता असं अनुष्का सांगते.
ई-टाइम्सशी बोलताना अनुष्का म्हणाली, ‘हा एक सोपा मार्ग आहे ज्यामुळे तुम्ही एक चांगलं आयुष्य जगू शकता. आपले कपडे सर्कुलेशन फॅशन सिस्टिममध्ये वापरून तुम्ही पर्यावरणासाठी एक चांगलं काम करू शकता. माझ्या प्रेग्नन्सीच्या काळात मी विचार केला की आपल्या आयुष्यातील हा वेळ सर्वात खास असतो. मग याचा उपयोग सर्कुलर इकॉनमीसाठी केला तर चांगलं होईल. यामुळेच मला आशा आहे की, आपण एकत्र येऊन याची सुरुवात करू शकतो.’
अनुष्काच्या कामाबद्दल बोलायचं तर ती शेवटची २०१८ मध्ये रिलीज झालेल्या शाहरुख खानच्या ‘झीरो’ चित्रपटात दिसली होती. त्यानंतर मात्र ती कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. सध्या अनुष्का आपली मुलगी वामिकाला वेळ देत आहे. याशिवाय ती निर्मिती क्षेत्रातही उतरली आहे.