रेमडेसिवीरचा साठा, त्याची उपलब्धता लक्षात घेता लोकांना ते मिळवण्यासाठी खूप धावाधाव करावी लागते. याचबरोबर प्लाझ्मासाठीही अनेक रुग्णांचे नातेवाईक दात्यांचा शोध घेत असतात. मात्र या दोन्ही बाबी करोनावर काम करण्यास असमर्थ असल्याचे विविध अभ्यासात समोर आल्याचे बेंगळुरू येथील राष्ट्रीय जैवविज्ञान संस्थेच्या शास्त्रज्ञ प्रा. दीपा आगाशे यांनी सांगितले. ‘इंडियन सायन्टिस्ट रिस्पॉन्स टू कोव्हिड-१९’ तर्फे आयोजित संवाद शास्त्रज्ञांशी या व्याख्यान श्रृंखलेच्या तिसऱ्या सत्रात त्या बोलत होत्या. प्लाझ्मा थेरपी ही करोनावर प्रभावी नसल्याचे समोर आल्यानंतर ‘आयसीएमआर’नेही याचा वापर करू नये, असे स्पष्ट केले आहे. याचबरोबर रेमडेसिवीरही प्रभावी नसल्याचे समोर येत आहे. सुरुवातीच्या काळात या इंजेक्शनचा उपयोग झाला. मात्र आता त्याचा उपचारासाठी उपयोग होत नाही असेही आगाशे यांनी सांगितले. उपचारपद्धतीसोबतच आता लसीकरण ही बाब सर्वात महत्त्वाची असल्याचे या चर्चासत्रात विषद करण्यात आले. यावेळी ‘जर्नल ऑफ व्ह्युज्युअलाइज्ड एक्स्प्रिमेंट’च्या डॉ. रोहणी करंदीकर याही यामध्ये सहभागी होत्या. तर होमी भाभा विज्ञान संस्थेचे प्रा. अनिकेत सुळे संवादक होते.