कमल सदानाचा पहिला सिनेमा बेखुदी मोठ्या पडद्यावर फारसा चाललानाही. पण त्यानंतर आलेल्या ‘रंग’ सिनेमाने त्याला ओळख मिळवून दिली. यानंतर त्याने अनेक सिनेमांत काम केलं. पण रंग सिनेमासारखी प्रसिद्धी त्याला कधीच मिळाली नाही.
यानंतर मोठ्या पडद्यावरून कमलने आपलं लक्ष छोट्या पडद्याकडे अर्थात टीव्हीकडे वळवलं. कसम से मालिकेत त्याने काम केलं. एवढंच नाही तर दिग्दर्शनातही त्याने आपलं नशिब आजमावून पाहिलं. २००७ मध्ये त्याने कर्कश सिनेमाचं दिग्दर्शन केलं. याशिवाय २०१४ मध्ये त्याने रोर नावाच्या सिनेमाचं दिग्दर्शन केलं. पण हा सिनेमाही फ्लॉप ठरला.
२० व्या वाढदिवसाच्या दिवशी कमलचे वडील प्रसिद्ध दिग्दर्शक ब्रिज सदाना यांनी पत्नी आणि मुलीवर गोळ्या झाडल्या. यावेळी कमल तिथेच होते. कमल यांनी तिथून पळ काढला म्हणून त्यांचा जीव वाचला. यानंतर त्याच रात्री वडिलांनीही आत्महत्या केली. कमलची आई सैदा खान आणि वडिलांमध्ये सतत भांडणं व्हायची. कमल यांच्या वाढदिवसालाही काहीसं असंच घडलं.
ही संपूर्ण घटना कमलच्या डोळ्यासमोर घडली. या घटनेचा त्याच्या मनावर खोलवर परिणाम झाला. यानंतर कमल यांचं समुपदेशन करण्यात आलं होतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कमल सदाना याला वडिलांनी आई आणि बहिणीवर गोळी का झाडली याचं मुळ कारण आजपर्यंत माहीत नाही.