Home ताज्या बातम्या फडणवीस:कोकणाला 9 दिवसात काहीच मदत मिळाली नाही, लोकांना जिथं ठेवलंय ती अवस्था खुराड्यासारखी

फडणवीस:कोकणाला 9 दिवसात काहीच मदत मिळाली नाही, लोकांना जिथं ठेवलंय ती अवस्था खुराड्यासारखी

रायगड : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चक्रीवादळाने नुकसान झालेल्या कोकणची पाहणी केली. ‘चक्रीवादळाने प्रचंड नुकसान झालंय. 9 दिवसात कोणतीही मदत मिळालेली नाही, जिथे नुकसानग्रस्तांना ठेवलंय, त्याची अवस्था खुराड्यासारखी आहे. अनेकांचे हाल होत आहेत, सर्वात आधी त्यांची राहण्याची योग्य सोय करावी, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना जिथं लोकांना जिथं ठेवलं आहे त्याची अवस्था खुराड्यासारखी आहे. अत्यंत वाईट अवस्थेत लोकांना ठेवण्यात आलं आहे. त्यांना आधी योग्य ठिकाणी ठेवलं पाहिजे. सरकारने हेक्टरी 50 हजाराची मदत घोषित केली आहे. मात्र, हे नुकसान वेगळं आहे. पिकांच्या बाबतीत ही मदत ठिक आहे, पण कोकणात पुढील अनेक वर्षे उत्पन्न देणारी झाडं पडली आहेत. जी उभी आहेत त्या झाडांची अवस्था देखील वाईट आहे.

कोकणात जमिनीची मालकी सर्वात कमी आहे. अनेकांना गुंठ्यातच जमीन आहे. त्यामुळे एका शेतकऱ्याला गुंठ्यावारी हजार रुपयेच मिळेल. सरकारने याचे निकष बदलले पाहिजे. सरकारने थेट आर्थिक मदत द्यावी. पडलेली झाडे कापून बाहेर काढण्यासाठी रोजगार हमी अथवा अन्य योजनेतून मजुरांची व्यवस्था केली पाहिजे. हवी तर वन विभागाची मदत घ्यावी.

भविष्यात 100 टक्के फळभाग अनुदानाचा लाभ सर्व शेतकऱ्यांना दिली पाहिजे. सरकारने केलेली मदत अत्यंत तोकडी आहे.

मी मोठ्या प्रमाणात मासेमारी करणाऱ्या बांधवांची भेट घेतली. त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या होड्या खराब झाल्या आहेत. त्यांची किंमत 1 ते 2 लाख रुपये आहे. मागील काही काळात 3 वेळा वादळाचा फटका कोकणाला बसला. त्यामुळे त्यांना मागील काही दिवसात मासेमारी करण्यासाठी देखील जाता आले नाही. त्यामुळे सरकारने मासेमारी करणाऱ्यांना थेट आर्थिक मदत द्यावी.

कोकणात घरांची मोठी पडझड झाली आहे. राज्याने सध्या दीड लाख रुपये देऊ असं सांगितलं. मात्र, तेवढ्याने काही होणार नाही. आम्ही आमच्यावेळी केंद्र आणि एनडीआरएफची एकत्रित रक्कम देऊन अडीच लाख रुपयांपर्यंतची मदत देऊ केली होती. आत्ता लोकांना घरावर छतं लावायची आहेत त्याची काळाबाजार सुरु झाला आहे. सरकारने या काळा बाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. सरकारने या गोष्टी कमी किमतीत उपलब्ध करुन द्याव्यात.

वीज यंत्रणा देखील दुरुस्त करण्याची गरज आहे. आज 9 दिवस होऊनही वीजेची यंत्रणा दुरुस्त झालेली नाही. राज्यातील सर्व पथकं येथे आणून वेगाने येथील वीज यंत्रणा दुरुस्त करावी. वीज नसल्याने पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद आहेत. नागरिकांना पिण्याच्या पाण्याची अडचण होत आहे. तोपर्यंत टँकर पुरवले पाहिजेत.

पर्यंटन येथील मोठा उद्योग आहे. स्टॉलपासून हॉटेलपर्यंत सर्वांवर मोठे संकट आले आहे. छोट्या स्टॉल धारकांना आम्ही 50 हजार रुपयांची मदत देऊ केली होती, मात्र राज्य सरकारच्या घोषणेत याबाबत काहीही दिसत नाही. केंद्राच्या योजनेत या लोकांना बसवता येईल का, राज्य सरकारने देखील यात काही भर घालता येईल का याचाही विचार करावा. प्रशासन प्रयत्न करत असेल, मात्र त्याचा नागरिकांना उपयोग होताना दिसत नाही.

केंद्र सरकारने प्रत्येक राज्यात एसडीआरएफ तयार केले आहे. त्याला निधी दिला जातो. अधिक खर्च झाला तर केंद्र त्याचा परतावा करते. केंद्र सरकारचं पथक येऊन ते पाहणी करुन निधी देतात.

आम्ही सरकारमध्ये असताना भांडी आणि कपड्यांसाठी साडेसात हजार , तर 10 हजार रोख दिले होते. घर बांधायला वेळ लागेल म्हणून 36 हजार आणि 24 हजार रुपये घरभाडे दिले होते. चालू कर्ज माफ केले होते. कोकणाला कधीही कर्जमाफीचा फायदा होत नाही. कारण हे लोक प्रामाणिकपणे कर्ज भरतात. त्यामुळे त्यांचे चालू कर्ज माफ केले पाहिजे. सध्या कोकणात पूर्ण झाडं उद्ध्वस्त झाली आहेत. यात फक्त या हंगामातील पिकांचं नुकसान झालेलं नाही, तर संपूर्ण बागाच उद्ध्वस्त झाल्या आहेत. म्हणून त्याच्यासाठी वेगळा विचार करायला हवा.