पनवेल तालुक्यातील आदिवासीबहुल भाग असलेल्या धामणी, वांगणी, मालडुंगे आदी निसर्गसौदर्य़ाने नटलेल्या भागात मागील काही वर्षांत फार्महाऊसची संख्या वाढली आहे. फार्महाऊसची संख्या वाढल्याचे दुष्परिणाम आता येथील आदिवासींना सहन करावे लागत आहेत. या भागातील लहान धामणी या शंभर टक्के आदिवासी गावाजवळ २५पेक्षा अधिक फार्महाऊस आहेत. त्यामुळे या भागात दररोज शहरातून ये-जा करणाऱ्यांची संख्यादेखील मोठी असते. त्यामुळे काही वर्षांपूर्वीपर्यंत सामसूम असलेल्या रस्त्यांवर वाहने धावू लागली आहेत. रस्त्यावर पुढे वाहन नसल्याने येणारे वाहन वेगाने येते. मोकळा रस्ता आणि गावाजवळ गतिरोधक नसल्यामुळे वाहनचालक सुसाट जात असतात. कर्णकर्कश हॉर्न वाजवतात. या प्रकारामुळे अपघात होण्याची भीती आहे. भीतीने या भागातील नागरिकांना रस्त्यावरून चालणे मुश्कील झाले आहे. वाहनांच्या सुसाट वेगाला ‘ब्रेक’ लागावा म्हणून स्थानिकांनी रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या वाहनचालकांना पर्यायी रस्ता द्यावा, असे मत स्थानिक नागरिक अजय चौधरी यांनी व्यक्त केले आहे.
फार्महाऊस मालक सुसाट; ग्रामस्थांचा जीव मुठीत
म. टा. वृत्तसेवा, पनवेल
- Advertisement -