Home ताज्या बातम्या फिनिक्स च्या “जीवन गौरव’ कार्यक्रमात”आमचं ठरलंय” टीम ची रंगीत तालीम

फिनिक्स च्या “जीवन गौरव’ कार्यक्रमात”आमचं ठरलंय” टीम ची रंगीत तालीम

0


खटाव-माणडॉ विनोद खाडे
खटाव तालुक्यातील एनकुल चे जेष्ठ साहित्यीक उत्तम बंडू तुपे यांचा जीवनगौरव पुरस्कार कार्यक्रम नुकताच वडुज येथे संपन्न झाला. फिनिक्स सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास मंत्री जानकर यांचे सह तालुक्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. त्यामध्ये स्वतः केलेल्या काही विकास कामाचे श्रेय दुसऱ्याला जातंय हे स्वतःच्या डोळ्यांनी बघणारे भाजपचे माजी आमदार डॉ दिलीपराव येळगावकर,आपली आधीच जिरलीय,आता कुणाची जिरणार? अशा मनस्थितीत असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्रभाकर घार्गे, प्रशासनात वेळोवेळी समय सुचकता ओळखून फलंदाजी केलेले माजी आयुक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाकर देशमुख, कोणत्या मुद्द्याला कधी हात घालायचा याचे आकस्मिक मूल्यांकन करणारे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई,आणि सव्वा वर्षात च मला सभापती पद सोडायला लावलंय, आताशी कुठे तयारी करायला लागलोय तोपर्यंत सगळ्यांच ठरलंय, आता मी नक्की काय करू?ही मानसिकता असणारे पंचायत समितीचे माजी सभापती संदीप मांडवे ही खरी मंडळी खटाव माण विधानसभेच्या उमेदवारी साठी प्रबळ दावेदार असणारी आहे.आयोजक रणजितसिंह देशमुख ही याला अपवाद नाहीत. खरं तर यां सर्वांचे एकच मोठं दुखणं आहे,ते म्हणजे विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांना कोणत्याही परिस्थितीत भाजपात प्रवेश मिळू न देणं.अगदी त्याच वेळी बोराट वाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यात जयकुमार गोरे बोलले “जर राष्ट्रीय काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांस भाजपचे तिकीट मिळवून खासदार म्हणून निवडून आणू शकतो तर आमचं पण मुख्यमंत्र्यांशी तुमच्या आधीच ठरलंय” खरं तर जनतेला यातील प्रत्येक जण आपापल्या परीने गृहीत धरतोय.फिनिक्स च्या कार्यक्रमात डॉ येळगावकरांनी तर एक ब्रिटिश कालीन उदाहरण देवून या मतदारसंघातुन एक नाही “दोन गोरे” बाहेर घालवायचे संकेत दिले,आणि जानकर साहेब “या विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत आमची सगळ्यांची जिरलीय, एक तर गोरेची जिरवा,न्हायतर तुमची जिरवून घ्या”आशा शब्दांत अप्रत्यक्षपणे मंत्री जानकर यांनाच उमेदवारी घेण्याचं संकेत दिले. अनिल देसाई नी पण त्याच दिशेने चौकार मारले.राजकीय पटलावरील हे सगळे धुरंधर साहित्यिक फक्त बोराट वाडीच्या एका चाणाक्ष व्यक्ती वर
ज्याप्रमाणे नागपंचमीच्या सणाला भट्टीमध्ये लाह्या, फुटाणे भाजतात त्याप्रमाणे च स्तुतीसुमने उधळताना दिसत होते.व्यासपीठावर ही भट्टी सुरु करुन कार्यक्रमाचे आयोजक देशमुख मात्र व्यासपीठाच्या बाजूला खाली बसून लाह्या, फुटाणे भाजण्याचा मुक्तपणे आस्वाद घेत होते.खरं तर तालुक्यातील हे सर्व नेते बऱ्यापैकी सक्षम आहेत.यांनी मनात आणलं असतं तर खटाव माण च्या जनतेवर आज ही वेळ आलीच नसती.निवडणूका जवळ आल्या की यांची रंगीत तालीम सुरू.यातील कितीजणांनी तालुक्यातील जनतेच्या विकासकामी पदर मोड केली आहे. कसं ही असलं तरी शेखर गोरे नी निदान पदरमोड करून जनतेला दुष्काळात हातभार लावला. त्यांनी अजून काय ठरवलंय हे पण विचारात घ्यावं लागेल. कुनाच काय ठरलंय हे सांगण्यापेक्षा “पाण्याचं काय ठरलंय” हे जर एखाद्या हिम्मतवाण नेत्याने पुढं येवून जनतेला सांगितले तर “एवढ्या लाह्या, फुटाणे,भाजायची वेळ येणार नाही असं जनतेला वाटतंय.आणि तसं यंदा पाऊसपाणी बरं हाय…. ज्याला लवकरात लवकर येथील जनतेला कायमस्वरूपी पाणी देता येईल, त्यालाच विधानसभेत जाता येईल….…एवढंच येथील जनतेचं ठरलंय.