श्रीवर्धन :तरुणांना जाळ्यात अडकवून फिल्मी स्टाइलने खंडणी मिळवणारी टोळी श्रीवर्धन पोलिसांनी जेरबंद केली आहे. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार संबंधित टोळी तरुणांना हनी ट्रॅपचा उपयोग करून लुटत असे.
पीडित तरुणाने श्रीवर्धन पोलीसांत दिलेल्या फिर्यादीत या टोळीने तरुणीच्या मोबाइलवरून फोन करून माणगावच्या मयूर लॉजवर ज्याला बोलावून घेतले. तरुणांशी टोळीतील मुलीने मी तुला ओळखते व माझे वडील आजारी आहेत त्यांच्या उपचारासाठी पैशांची गरज आहे असे सांगितले. हा तरुण माणगावला गेल्यावर त्याला तेथे नियोजनपूर्वक अडकवण्यात आले. त्या वेळी विशाल मोरे हा त्या तरुणीचा भाऊ बनून व भूषण पतंगे पत्रकार बनून तेथे हजर झाले. कॅमेरे व मोबाइलवर त्यांनी संबंधित तरुणांची रेकॉर्डिंग करण्यास सुरुवात केली व त्यास मारहाण करून जगदीश ठाकूर यांच्या कारमध्ये जबरदस्तीने बसवून अपहरण केले. त्याची सुटका करण्यासाठी १५ लाखांची मागणी केली.
हे प्रकरण पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर श्रीवर्धन पोलिसांनी आरोपी भूषण पतंगे (२९),विशाल मोरे (३३), कुणाल बंदरी (२८), सिद्धार्थ मोरे (२७), अलका ठाकूर (६५, सर्व राहणार अलिबाग), जगदीश ठाकूर (४२रा., मुरुड), अक्षय दासगावकर (२५, रा. माणगाव) यांना अटक केली आहे. तसेच पूजा व अजून एका अनोळखी महिलेचा शोध पोलीस घेत आहेत.