मुंबई, दि. १०: ‘फूड सेफ्टी ऑन व्हील्स’ या विशेष उपक्रमांतर्गत बृहन्मुंबई परिसरात १ ते १५ जूनपर्यंत व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांमध्ये सुरक्षित अन्नाविषयी जागरूकता निर्माण करणे, अन्नभेसळीमुळे होणाऱ्या आजारांपासून बचावासाठी आवश्यक खबरदारीची माहिती देणे आणि जनजागृती करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
मोहिमेदरम्यान सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठा, शैक्षणिक संस्था, रेल्वे स्थानके आणि इतर गर्दीच्या परिसरांमध्ये विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले. फिरत्या अत्याधुनिक प्रयोगशाळेद्वारे विविध अन्नपदार्थांचे ६९ नमुने जागेवरच तपासण्यात आले. या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, अन्नविक्रेते आणि अन्न व्यवसायिक यांच्याशी थेट संवाद साधून अन्न सुरक्षा, स्वच्छता, सुरक्षित अन्न हाताळणी, अन्न साठवणूक, अन्नपदार्थांवरील लेबलची माहिती, कालबाह्य अन्नपदार्थ टाळण्याचे महत्त्व तसेच भेसळयुक्त अन्न ओळखण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.
राज्यात अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्याबरोबरच जनतेमध्ये अन्न सुरक्षेबाबत व्यापक जनजागृती करण्यावर विशेष भर दिला जात आहे. केवळ कारवाईपुरते मर्यादित न राहता नागरिकांना मार्गदर्शन, शिक्षण आणि जनजागृतीच्या माध्यमातून सुरक्षित अन्नाच्या संकल्पनेशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून अन्न व औषध प्रशासनामार्फत राबविले जात आहे.
कार्यक्रमादरम्यान दुग्धजन्य पदार्थ, मसाले, खाद्यतेले आणि इतर अन्नपदार्थांमधील संभाव्य भेसळ ओळखण्यासाठी प्रत्यक्ष प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. घरच्या घरी करता येणाऱ्या प्राथमिक चाचण्यांची माहिती नागरिक, विद्यार्थी आणि अन्नविक्रेत्यांना देण्यात आली. त्यामुळे अन्नभेसळीविषयी जागरूकता वाढण्यास आणि सुरक्षित अन्न निवडण्याबाबत मदत होईल.
याशिवाय विविध दूध संकलन केंद्रांना भेटी देऊन दूधाच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. या तपासणीच्या माध्यमातून दूधाची गुणवत्ता, शुद्धता आणि सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्यात आली तसेच भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या सुरक्षा मानकांचे पालन करण्याबाबत बृहन्मुंबई विभागाचे सहआयुक्त म. ना. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही करण्यात आली.
मोहिमेदरम्यान नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित अन्नपदार्थांची निवड करणे, अन्नपदार्थ खरेदी करताना उत्पादन व कालबाह्यता दिनांक तपासणे, शिजविलेले अन्न योग्य तापमानात साठवणे, वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेणे आणि अन्न सुरक्षा संदर्भातील तक्रारी संबंधित यंत्रणेकडे नोंदविणे याबाबत विशेष आवाहन करण्यात आले.
‘फूड सेफ्टी ऑन व्हील्स’ हा उपक्रम केवळ विशेष मोहिमेपुरता मर्यादित नसून बृहन्मुंबई परिसरात सातत्याने राबविण्यात येत आहे. आगामी काळातही विविध भागांमध्ये अशाच जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करून अधिकाधिक नागरिक, विद्यार्थी आणि अन्न व्यवसायिकांपर्यंत अन्न सुरक्षा विषयक माहिती पोहोचविण्यात येणार आहे.
अन्न सुरक्षा नियमांचे पालन आणि जनसहभाग यांमधूनच सुरक्षित व निरोगी समाजाची निर्मिती शक्य असल्याने प्रत्येक नागरिकाने अन्न सुरक्षेबाबत सजग राहून सुरक्षित अन्नाचा स्वीकार करावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.
००००
किरण वाघ/विसंअ




















WhatsApp