Home बातम्या राष्ट्रीय बंदर वाहतुकीत 30 टक्के वाढ

बंदर वाहतुकीत 30 टक्के वाढ

0

नवी दिल्ली: गेल्या तीन ते चार वर्षांत भारतात समुद्रमार्गे वाहतूक करण्यासाठी केंद्रिय रस्ते व जहाज बांधणी मंत्रालयाने मोठी चालना दिलेली आहे. त्यानुसार सुम्द्रामार्गे करावयाच्या देशांतर्गत वाहतूक आणि निर्यातक्षम व्यापारात वाढ झाल्याचे ‘असोचेम’च्या अहवालात स्पष्ट झाले आहे.

मर्चंट नेव्ही अर्थात व्यापारी नौदल हे दल असून मालाच्या सागरी वाहतुकीसाठी काम करते. एका देशातून दुसऱ्या देशात व्यापारासाठी समुद्रीमार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. सागरी व्यापारात मर्चंट नेव्हीची भूमिका महत्त्वपूर्ण असते. हे दल व्यापारी जहाजांच्या प्रत्येक हालचालीस जबाबदार असते. यात विविध कामांसाठी मनुष्यबळाची नियुक्ती केली जाते.

मागील काही वर्षांमध्ये देश-विदेशांत वाढत्या व्यावसायिक घडामोडींमुळे मर्चंट नेव्हीमध्ये मनुष्यबळाची मागणी वाढली आहे. सध्या या दलात 60 हजार अधिकाऱ्यांची गरज आहे. जहाज वाहतूक मंत्रालयानुसार, आयाताच्या दृष्टिकोनातून 95 टक्के आणि किमतीच्या बाबतीत 60 टक्के देशांचा व्यापार सागरी मार्गाने होतो.

असोचेमच्या एका अहवालानुसार, वर्ष 2017-18 मध्ये देशातील निर्यात 35 टक्‍क्‍यांनी वाढली आहे. यात शेती आणि त्याच्याशी संबंधित क्षेत्राची भूमिका महत्त्वाची आहे. देशात 12 मोठी आणि 200 लहान बंदरे आहेत. वर्ष 2017 च्या अखेरपर्यंत मालवाहतूक 1 हजार 60 दशलक्ष मेट्रिक टन होती. वर्ष 2018 च्या अखेरपर्यंत ती 1 हजार 900 दशलक्ष मेट्रिक टन होण्याची शक्‍यता आहे.

ही मालवाहतूक करत असताना काही मोठ्या बंदरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतुकीची समस्याही उद्‌भवली. बंदरातील वाढत्या व्यापारी घडामोडी आणि त्यांच्या विकासासाठी मर्चंट नेव्हीची गरज अधिकच भासू लागली आहे. देशातील वाढता आंतरराष्ट्रीय व्यापारसुद्धा यामागील एक कारण आहे. त्यामुळे युवकांसाठी हे क्षेत्र चांगला पर्याय ठरू शकते. मर्चंट नेव्हीमध्ये बहुतांश कंपन्या करारानुसार नोकरी देतात.

हा करार 6 ते 9 महिन्यांचा असतो. काही वर्षांपूर्वी हे क्षेत्र फक्त पुरुषांसाठीच योग्य मानले जात होते. मात्र, आता ही मानसिकता बदलली असून महिलांसाठीही रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. मर्चंट नेव्हीत कॅप्टनसोबतच चीफ ऑफिसर, सेकंड ऑफिसर, थर्ड ऑफिसरची सुरक्षा आणि जबाबदारीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण भूमिका असते. सोबतच मरीन इंजिनिअर, फिफ्थ इंजिनिअर, ज्युनियर इंजिनिअर, रेडिओ ऑफिसर, नॉटिकल सर्व्हेअरसारख्या पदांसाठीही प्रशिक्षित मनुष्यबळ लागते. आंतरराष्ट्रीय व्यापाराची जवळपास संपूर्ण जबाबदारी मर्चंट नेव्हीचीच असते.

जहाज वाहतुकीमध्ये होत असलेल्या वाढीमुळे रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी होत आहे. तसेच देशांतर्गत रस्त्यांच्या रुंदीकरणाच्या प्रकल्पांमुळेही म्प्प्लअभूत वाहतूक पुरवण्यात भारत विकसित देशांची बरोबरी करण्याच्या क्षमतेला येऊन पोहोचत आहे. वर्ष 2022 अखेर राष्ट्राय महामार्गांचे विस्तृत जाळे देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल, असे रस्ते विकास व जहाज बांधणी मंत्रालयाने म्हटले आहे.