- बचतगटांनी उत्पादित केलेल्या मालाची विक्री व प्रदर्शन
लातूर, दि. २६ : महिला बचतगटाची चळवळ राज्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रुजली आहे. या बचतगटांच्या माध्यमातून अनेक चांगल्या वस्तूंची निर्मिती केली जात आहे. या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी योग्य प्रकारे मार्केटिंग करण्याची आवश्यकता असल्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी आज येथे सांगितले.
जिल्हा क्रीडा संकुल येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत २६ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ या काळात आयोजित मिनी सरस व जिल्हास्तरीय ‘हिरकणी हाट-२०२५’ प्रदर्शन व विक्री महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री श्री. भोसले बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर, जिल्हा व्यवस्थापक देवकुमार कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
ग्रामीण भागातील पारंपारिक कलाकुसर, खाद्यपदार्थ, वस्तू यांचे उत्पादन बचतगटांच्या माध्यमातून घेतले जाते. या वस्तूंची माहिती ग्राहकांपर्यंत पोहचल्यास त्यांची मागणी वाढेल. आज काही बचतगट चांगले पॅकेजिंग, मार्केटिंग करीत आहेत. जिल्ह्यातील सर्वच बचतगटांच्या दर्जेदार वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावेत. यासोबतच ई-कॉमर्स संकेतस्थळावर जिल्ह्यातील बचतगटांची उत्पादने विक्रीला ठेवण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री श्री.भोसले यांनी दिल्या. आज बाजारपेठेत गुणवत्ता आणि पॅकेजिंगला अधिक महत्त्व असल्याने बचतगटांनी याबाबत सजग राहावे, असे त्यांनी सांगितले.
प्रारंभी पालकमंत्री श्री. भोसले यांच्या हस्ते फीत कापून ‘हिरकणी हाट २०२५’ महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी विविध बचतगटांच्या स्टॉलला भेटी देवून त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची माहिती घेतली. प्रास्ताविकात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक श्रीमती क्षीरसागर यांनी महोत्सवाच्या आयोजनाबाबत माहिती दिली.
महोत्सवात ७५ स्टॉलचा समावेश
मिनी सरस व हिरकणी हाट महोत्सवात लातूर जिल्ह्यातून ६५ व राज्यातील इतर जिल्ह्यातून १० स्टॉल असे एकूण ७५ स्टॉल लावण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना अस्सल ग्रामीण स्वादिष्ट पदार्थ चाखण्याची आणि खरेदी करण्याची संधी मिळत आहे. भजी-भाकरी, पिठल-भाकरी, बासुंदी, मांडे, पुरणपोळी, दही धपाटे, तीळ-गुळाची पोळी, निलंगा राईस, बोरसुरी वरण व चाट आदी पदार्थांची चव याठिकाणी चाखायला मिळेल. तसेच सोलापूर जिल्ह्यातील उजनी स्पेशल खेकडा, मच्छी थाळी, चिकन, खानदेशी मांडे, मटन, ज्वारी व बाजरी भाकरी या ग्रामीण भागातील मुख्य आकर्षण असलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश आहे.
०००