हायलाइट्स:
- दिव्या खोसला कुमारने पर्ल पुरीचे केले समर्थन
- समर्थासाठी सोशल मीडियावर लिहिली प्रदीर्घ पोस्ट
- नवरा-बायकोच्या भांडणाच पर्लचा बळी दिला जात असल्याचा दावा
ऑडिओ झाला लीक
एकता आणि त्या मुलीच्या आईच्या संभाषणाचा ऑडिओ लीक झाला. ऑडिओमध्ये एकता कपूर त्या मुलीच्या आईला आग्रहाने सांगते आहे की, सर्वांसमोर तू ये आणि खरे काय आहे ते सांग. त्या मुलीची आई सांगते की पर्लवर लावलेले सर्व आरोप खोटे आहेत. या ऑडिओमध्ये एकता म्हणते या प्रकरणात त्या मुलीचे तसेच पर्लचेही नाव गोवले जात आहे. या सगळ्याचा त्याच्या व्यक्तिगत आयुष्यावरही वाईट परिणाम होणार आहे. दरम्यान, ऑडिओमध्ये मुलीच्या आईने अनेक गोष्टींचे खुलासे करत यात पर्लला अडकवल्याचे सांगितले आहे.
मुलीचा ताबा घेण्यावरून वाद
एकताचा कथित ऑडिओ लीक झाल्यानंतर दिव्यानेदेखील इन्स्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये तिने पीडित मुलीच्या पालकांची ओळख करून दिली. पीडित मुलीची आई अभिनेत्री असल्याचेही दिव्याने तिच्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. तसेच याच पोस्टमध्ये पीडित मुलीच्या वडिलांची ओळख करून दिली आहे. मुलीच्या वडिलांनीच पर्लने बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या मते ‘बेपनाह प्यार’ मालिकेच्या सेटवर पर्लने त्यांच्या पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला होता. दोन वर्षांपूर्वी आलेल्या या मालिकेची निर्मिती बालाजी टेलीफिल्मने केली होती. हे दोघे नवरा- बायको आता विभक्त झाले असून त्यांच्यात मुलीच्या कस्टडीवरून वाद सुरू आहे.

नवरा- बायकोमधील वाद
दिव्याने पुढे लिहिले की, ‘पीडित मुलीच्या वडिलांनी तिच्या आईवर केस केली असल्याने दोन वर्षांपासून त्या मुलीचा ताबा वडिलांकडे आहे. मुलीची आई अभिनेत्री आहे आणि ती मुलीला सेटवर घेऊन जायची. त्या ठिकाणी मालिकेतील प्रमुख अभिनेते मुलीवर बलात्कार करायचे. त्यामुळे माझी मुलगी तिच्या आईकडे सुरक्षित नाही असा दावाही त्या वडिलांनी केला आहे. ‘ दिव्याने पुढे लिहिले की, ‘ मला वाटते की या मुलीच्या वडिलांना सर्वोत्कृष्ट पटकथा लेखकासाठी बक्षिसच द्यायला पाहिजे.’
एफआयआरमध्ये नाव नाही
दिव्याने पुढे लिहिले, ‘पोलिसांनी पर्लला अटक केली आहे. मला माहिती आहे की ही तक्रार २०१९ मध्ये नोंदवण्यात आली होती. मग तेव्हाच पोलिसांनी पर्लला अटक का केली नाही. यावरून हेच स्पष्ट होते की एफआयआरमध्ये स्पष्टपणे लिहिले होते की मुलीचे जेव्हा लैंगिक शोषण झाले तेव्हा ती आईसोबत होती. एफआयआरमध्ये पर्लचे नावही नाही. मी स्वतः ही एफआयआरची कॉपी वाचली आहे. ही कॉपी मला पर्लच्या आईने पाठवली आणि मला मदतीसाठी फोन केला. मुलीच्या आईने एकता कपूरबरोबर केलेल्या संभाषणामध्ये देखील तिचा नवरा मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचे सांगितले होते. इतकेच नाही तर त्या मुलीच्या वडिलांनी तिच्या आईला अनेकदा मारहाण ही केली होती. त्याचे पुरावेदेखील तिच्याकडे आहेत. यावरून तरी पर्ल याप्रकरणी संपूर्णपणे निर्दोष आहे आणि सेटवर अशाप्रकारची कोणतीही घटना घडलेली नाही, हे स्पष्ट होते.’
दिव्याने केले आवाहन
दरम्यान, याप्रकरणी सातत्याने पर्ल निर्दोष असल्याचा दावा दिव्याने केला आहे. पीडित मुलीच्या आई-वडिलांच्या व्यक्तिगत भांडणामध्ये पर्ल अडकला गेला आहे. दिव्याने लिहिले आहे की, पर्ल हा दोषी नाही. त्यामुळे त्याच्या सहकलाकारांनी समर्थनासाठी पुढे यावे. त्याचबरोबर लोकांनीही त्यांचा पाठिंबा पर्लला द्यावा, अशी विनंती तिने केली आहे. पीडित मुलीचे वडील स्वतःच्या स्वार्थासाठी तिचा गैरवापर करत असल्याचे मत दिव्याने व्यक्त केले आहे. शेवटी तिने लिहिले की, ‘पर्ल चुकीचा नाही. त्याच्यावर वाईट संस्कार झालेले नाहीत. त्याच्या मदतीसाठी सर्वांनी पुढे यावे. नेहमी सत्याचा विजय होतो.’ दिव्याच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटी प्रतिक्रिया व्यक्त करत पर्लला समर्थन देत आहेत.