बामूतील प्राध्यापकांच्या ई-सेवार्थ संबंधात शासन सकारात्मक

- Advertisement -

मुंबई: औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सन 2005 ते 2010 या कालावधीतील पदभरती केलेल्या 28 सहाय्यक प्राध्यापकांची सेवा ई-सेवार्थ करण्याबाबत शासन सकारात्मक असून यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

विधानभवनात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ भरतीप्रक्रियेतील सहाय्यक प्राध्यापक यांचे ई-सेवार्थ संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला आमदार डॉ.राहूल पाटील उपस्थित होते.

सामंत म्हणाले, ज्या प्राध्यापकांची भरती प्रक्रिया होऊन अनेक वर्ष होऊन गेली तरी त्यांना ई-सेवार्थमध्ये का घेतले नाही याचा तपास करावा. तसेच याबाबत काही न्यायालयीन प्रकरण आहे का हे ही तपासावे. प्राध्यापक भरती प्रक्रिया राबविताना शासनाची पदाला मान्यता, बिंदू नामावली या सर्व बाबींची पूर्तता केली आहे का याचा एकत्रित अहवाल तयार करुन पुढील 15 दिवसात पुन्हा आढावा बैठक घेऊन यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले. बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय उपस्थित होते.

समांतर विद्यापीठासंदर्भात बैठक

राज्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच चांगल्या शैक्षणिक सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठी समांतर विद्यापीठासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेता येईल का यासाठी एक समिती तयार करावी. या समितीने इतर देशातील समांतर विद्यापीठ त्यांच्या मार्गदर्शक सूचनांचा अभ्यास करुन राज्यातील चांगल्या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून समांतर विद्यापीठांसंदर्भात एक धोरण तयार करावे, असेही सामंत यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -