Home ताज्या बातम्या बारमाही रस्ते, घरकुले आणि स्वयंरोजगारातून वाडे-पाडे समृद्ध करणार – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

बारमाही रस्ते, घरकुले आणि स्वयंरोजगारातून वाडे-पाडे समृद्ध करणार – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

0
बारमाही रस्ते, घरकुले आणि स्वयंरोजगारातून वाडे-पाडे समृद्ध करणार – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार, दिनांक 7 फेब्रुवारी 2024 (जिमाका वृत्त) :- आदिवासी दुर्गम भागाला जोडणारे बारमाही रस्ते, प्रत्येकाला घरकुल आणि बचतगटांच्या माध्यमातून स्वयंरोजगाराचे जाळे विणून आदिवासी वाडे-पाडे येत्या सहा महिन्यात न भुतो न भविष्यती समृद्ध करणार, असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

ते आज अक्कलकुवा तालुक्यातील बिजरीगव्हाण येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, यावेळी सरपंच सर्वश्री विरसिंग पाडवी (भगदरी),दिलीप वसावे(सरी), रोशन वसावे (बिजरीगव्हाण),धनसिंग वसावे (डाब), सौ. ज्योती वळवी (मोलगी), दिनकर वळवी,दिनेश खरात,बबलू चौधरी व पंचक्रोशीतील अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री डॉ. विजयकुमार गावित म्हणाले, गेल्या दहा वर्षात मिळाला नाही त्याच्या दहापट निधी येत्या सहा महिन्यात विकास कामांसाठी नंदूरबार जिल्ह्यासाठी देण्यात आला आहे. येणाऱ्या पावसात कुठल्याही गावाचा, पाड्याचा संपर्क तुटणार नाही असे बारमाही रस्ते जिल्हाभर आपणांस पहावयास मिळणार आहेत. पात्र असलेल्या परंतु ‘ब’ यादीत नाव नसलेल्या प्रत्येक नागरिकाला घर दिले जाईल. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक बचतगटाला रूपये 10 हजारांचे अनुदान स्वयंरोजगार निर्मितीसाठी दिली जाणार आहे. सुमारे एक हजार महिलांना विविध कौशल्याचे प्रशिक्षण देवून त्यांच्या माध्यमातून गावातच रोजगार मिर्मितीला चालना दिली जाणार आहे. जो गाई पाळू इच्छितो त्याला गाई व वनपट्टे धारकांना शेळ्यांचे वितरण आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून केले जात आहे. प्रत्येक गावागावात अध्यात्म आणि लोकप्रबोधनाचे काम करणाऱ्या भजनी मंडळांना भजनाचे साहित्य, तरूण मुलांसाठी क्रिकेट चे साहित्या येत्या आठ दिवसात वितरीत केले जाणार आहे.

ते पुढे म्हणाले, जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक गाव,घर आणि व्यक्ती पर्यंत शुद्ध जल पोहचवण्यासाठी खासदार डॉ. हिना गावित यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी आणला असून जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांच्या नेतृत्वाखाली या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न असून वाड्यापाड्यातील समृद्धीसाठी आदिवासी विकास विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 

000