बालकांना पोषणासह चविष्ट आहार; घरपोच आहारात नव्या पाककृतींचा होणार समावेश – मंत्री आदिती तटकरे

बालकांना पोषणासह चविष्ट आहार; घरपोच आहारात नव्या पाककृतींचा होणार समावेश – मंत्री आदिती तटकरे
- Advertisement -


मुंबई, दि. १७ : अंगणवाडीतील बालकांसह गरोदर महिला, स्तनदा माता तसेच आकांक्षित जिल्ह्यांतील किशोरवयीन मुलींना देण्यात येणाऱ्या घरपोच आहारामध्ये पोषणमूल्यांसोबतच चवीलाही प्राधान्य देत नवीन आणि रुचकर पाककृतींचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत राज्यातील ६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील बालके, गरोदर महिला, स्तनदा माता तसेच आकांक्षित जिल्ह्यांतील किशोरवयीन मुलींना देण्यात येणाऱ्या घरपोच आहारासंदर्भात मंत्रालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री तटकरे यांनी स्वतः पोषण आहाराच्या गुणवत्तेची तपासणी केली. बैठकीस महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, आयुक्त माधवी सरदेशमुख, आयुक्त डॉ. जगदीश मणियार (दूरदृश्य प्रणालीद्वारे), सहसचिव वी. आर. ठाकूर, अवर सचिव सुनील सरदार, प्रसाद कुलकर्णी, सह आयुक्त वर्षा पवार, उपायुक्त संगीता लोंढे, विजय क्षीरसागर, जामसिंग गिरासे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, केंद्र शासनाच्या निकषानुसार सध्या घरपोच आहार प्रीमिक्स स्वरूपात वितरित केला जातो. मात्र, लाभार्थ्यांकडून मिळालेला प्रतिसाद, क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या सूचना तसेच तज्ज्ञांच्या शिफारशी लक्षात घेऊन या आहारामध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. सध्याच्या ‘एनर्जी डेन्स मूग डाळ खिचडी प्रीमिक्स’मधील घटकांच्या मिश्रणात सुधारणा करण्यात आली असून आहाराचा दर्जा अधिक चांगला राखण्यासाठी मसाल्याचे पाकीट स्वतंत्रपणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय ‘मल्टी मिक्स सिरियल्स अँड प्रोटीन्स’ ही पाककृती कायम ठेवण्यात आली आहे. तसेच ‘व्हेज पुलाव’ आणि ‘मल्टीग्रेन पफ’ या दोन नवीन पाककृतींचा समावेश करण्यात आला आहे.

या बदलांमुळे लाभार्थ्यांना आता  अधिक पौष्टिक आणि रुचकर पाककृतींचा घरपोच आहार उपलब्ध होणार आहे. सर्व पाककृतींमध्ये केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या प्रमाणात उष्मांक, प्रथिने आणि आवश्यक सूक्ष्म पोषकतत्त्वांचा (मायक्रोन्यूट्रिएंट्स) समावेश करण्यात आला आहे.

राज्यातील कुपोषण कमी करण्यासाठी शासन सातत्याने विविध उपाययोजना राबवत असून मागील तीन वर्षांत कुपोषणाच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या पाककृतींमुळे लाभार्थ्यांची आहाराबाबतची स्वीकृती वाढेल आणि कुपोषण कमी करण्याच्या प्रयत्नांना अधिक बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आहाराबाबत माहिती देताना डॉ. अनुपकुमार यादव म्हणाले की, आहारामध्ये बदल करण्यापूर्वी राज्यभर सर्वेक्षण करण्यात आले. तसेच वैद्यकीय अधिकारी, आहारतज्ज्ञ आणि विविध विशेषज्ञ संस्थांची मते जाणून घेण्यात आली. क्षेत्रीय यंत्रणांशी झालेल्या चर्चेदरम्यान या नवीन पाककृतींना लाभार्थ्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळेल.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ

 

 

 



Source link

- Advertisement -