
- मुंबई व उपनगर जिल्हा कार्यालयाने संयुक्तिकरित्या केलेली मोहिम यशस्वी
मुंबई दि. १०: बालविवाहमुक्त भारत घडविण्याच्या दिशेने देशात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत महिला व बालविकास विभागाने 100 दिवसांची तीव्र जनजागृती मोहीम राबविली होती. या यशस्वी मोहिमेदरम्यान संभाव्य बालविवाहाच्या 180 प्रकरणांची ओळख पटवून त्यांना रोखण्यात यश मिळाले असून, 6 बालविवाह वेळेवर हस्तक्षेप करून थांबविण्यात आले असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

ऑक्टोबर महिन्यात सुरू झालेल्या या मोहिमेचा समारोप आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त झाला. 2030 पर्यंत बालविवाहमुक्त भारत निर्माण करण्याच्या राष्ट्रीय उद्दिष्टाला बळ देणारा हा उपक्रम ठरला आहे. या ऐतिहासिक उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी महिला व बालविकास मुंबई जिल्हा कार्यालय, मुंबई उपनगर जिल्हा कार्यालय संयुक्तीकरित्या काम केले.

महिला व बाल विकास विभागाने कमिटेड कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट (सीसीडीटी) या संस्थेची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली होती. मुंबई जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा कार्यालयाने संस्थेच्या समन्वयातून विविध स्तरांवर जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात आल्या.
मोहिमेअंतर्गत ‘बालविवाह मुक्ती रथ’ मुंबई, मुंबई उपनगर तसेच पुणे जिल्ह्यातील शहरी झोपडपट्ट्या, ग्रामीण तसेच आदिवासी भागांमध्ये फिरत राहिला. या माध्यमातून बालविवाहाचे दुष्परिणाम, मुलींचे हक्क आणि शिक्षणाचे महत्त्व याबाबत व्यापक जनजागृती करण्यात आली. तसेच समाजातील विविध घटकांना एकत्र आणून सामूहिक कृतीला चालना देण्यात आली. चाईल्डलाईन हेल्पलाईन 1098 यांचा सक्रिय सहभाग होता. तसेच मुंबई व पुण्यात समुदायातील सदस्य, फ्रंटलाईन वर्कर्स आणि स्थानिक भागधारकांनीही सक्रिय सहभाग नोंदवला, असल्याची माहिती मुंबई जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शोभा शेलार यांनी दिली.
या मोहिमेमुळे केवळ जनजागृती वाढली नाही, तर बालविवाहाविरुद्ध सामूहिक लढा अधिक बळकट झाला आहे. 2030 पर्यंत देशातून बालविवाह पूर्णपणे समाप्त करण्याच्या निर्धाराला या उपक्रमामुळे नवी उर्जा मिळाली आहे. तज्ञांच्या मते, प्रत्येक मुलीला शिक्षणाचा हक्क, सन्मान आणि सुरक्षित भविष्य मिळवून देण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्रितपणे पुढे येणे आवश्यक आहे. बालविवाहमुक्त भारताच्या दिशेने ही मोहीम एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे.
०००
श्रद्धा मेश्राम/विसंअ


















WhatsApp