Home ताज्या बातम्या बाहेरून येणाऱ्या नागरिकांची आरोग्य तपासणी करावी – पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

बाहेरून येणाऱ्या नागरिकांची आरोग्य तपासणी करावी – पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

· जिल्ह्याच्या सीमांवर अनधिकृत प्रवेश करणाऱ्यांना रोखावे

· पालकमंत्री यांनी घेतला परिस्थितीचा आढावा

बुलडाणा : जिल्ह्यात सध्या बाहेरून येणा-या नागरिकांचे प्रमाण खूप वाढले आहे. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी परवानगी देण्यात आल्यानंतर अनेक कामगार, विद्यार्थी, मजूर व अडकलेले यात्रेकरू जिल्ह्यात दाखल होत आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या बाहेरून येणाऱ्या नागरिकांची आरोग्य तपासणी होणे आवश्यक आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करण्यात यावी, असे आदेश राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक दालनात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुगराजन, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद्र पंडीत, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पुरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे आदी उपस्थित होते.

परवानगी देण्यात आलेल्या दुकानांमधून मूळ किंमतीपेक्षा दुकानदार चढ्या दराने साहित्य विक्री करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, कृषी, बांधकाम या क्षेत्राशी निगडीत असलेले साहित्य काही दूकानदार मूळ किंमतीपेक्षा चढ्या दराने विक्री करीत आहे. अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे कुणीही दुकानदार अधिक दराने मालाची विक्री करीत असल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कोरोनाच्या या आपत्कालीन परिस्थितीत कुणीही नफेखोरी करू नये. नागरिकांना मूळ किंमतीतच माल विकून त्यांची लूट करू नये. असे केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असा इशाराही यावेळी पालकमंत्री यांनी दिला.

ते पुढे म्हणाले, बाहेरून आलेल्या नागरिाकांवर प्रशासनाने पूर्णपणे लक्ष ठेवावे आणि जिल्ह्याच्या सीमांवर अनधिकृतपणे प्रवेश करणाऱ्या नागरिकांना रोखावे. याबाबत पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी. येत्या 17 तारखेला लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपत आहे. तसेच 18 मे पासून चौथा टप्पा सुरु होणार असल्याचे केंद्र सरकारने यापूर्वीच जाहीर केले आहे. शासनाकडून या चोथ्या टप्प्यात जे काही नवीन निर्देश येतील, त्यांचे तंतोतत पालन व्हावे. नवीन निर्देशांनुसार जिल्हा प्रशासनाने आपले नियोजन तयार ठेवावे, असे निर्देशही पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी यावेळी दिले.