हायलाइट्स:
- मुंबईतील भाजप आमदाराची शरद पवारांवर टीका
- पवारांना दिली ‘बिघडलेल्या रिमोट’ची उपमा
- भाजपमुळंच कोकणात प्रशासन हलल्याचा दावा
शरद पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन पूरग्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस करत असलेल्या कामाची माहिती दिली. राज्य सरकारकडून त्यांनी यावेळी काही अपेक्षाही व्यक्त केल्या. त्याचबरोबर, पूरग्रस्त भागात राजकीय नेते करत असलेल्या दौऱ्यांबाबत त्यांनी नाराजी दर्शवली. पूरग्रस्त भागात सध्या मदत व पुनर्वसनाचं काम सुरू आहे. सर्व यंत्रणा कामात व्यग्र आहेत. अशा वेळी ज्यांचा काही संबंध नाही, अशा लोकांनी त्या भागांत जाऊ नये. त्यामुळं तेथील यंत्रणांचं लक्ष विचलित होऊन कामात अडथळा येतो. हे सांगताना त्यांनी लातूरमधील भूकंपाच्या वेळचा स्वत:चा अनुभव सांगितला. त्यावेळी पंतप्रधानांचा दौरा देखील आम्ही पुढं ढकलायला लावला होता, असं ते म्हणाले. त्यामुळं आताही नेत्यांनी प्रसंगावधान राखावं,’ असं आवाहन त्यांनी केलं.
वाचा: पुणे-बेंगळुरू हायवे पुरामुळं बंद पडू नये म्हणून अजित पवारांचा ‘ऑन दि स्पॉट’ निर्णय
पवार यांच्या या वक्तव्याचा संदर्भ देत भाजपचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ट्वीट केलं आहे. भातखळकरांनी पवारांना ‘बिघडलेला रिमोट’ अशी उपमा दिली आहे. ‘आपण करायचं नाही आणि इतरांना करू द्यायचं नाही, असा ठाकरे सरकारचा खाक्या आहे. संकटाच्या काळातही राजकारण सुटत नाही. बिघडलेला रिमोटही याला अपवाद नाही, असं भातखळकर यांनी म्हटलं आहे. ‘कोकणातील पूरग्रस्त भागांमध्ये भाजपचे नेते पोहोचले, तेव्हा प्रशासनाचा गाडा हलला,’ असा दावाही त्यांनी केला आहे. भातखळकरांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसकडून उत्तर दिलं जाण्याची शक्यता आहे.
आमदार अतुल भातखळकर यांचं ट्वीट
वाचा: ‘नेत्यांनी प्रसंगावधान राखावं, मी सुद्धा दौऱ्यावर जात नाही, त्याला कारण आहे’
वाचा: उद्धव ठाकरे एक दिवस देशाचं नेतृत्व करतील, राऊतांच्या विधानावर पवार म्हणाले…