Home ताज्या बातम्या बिबट्यांच्या संख्येबाबत वन विभागच अनभिज्ञ

बिबट्यांच्या संख्येबाबत वन विभागच अनभिज्ञ

0

राजुरी : जुन्नर तालुक्यात दिवसेंदिवस बिबट्याच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, तालुक्यात नेमके किती बिबटे आहेत, याचा अंदाज खुद्द वन खात्यालाही नाही. ग्रामस्थांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
साधारणपणे २५ ते ३० वर्षांपूर्वी वाघ, बिबट्या, लांडगे, तरस ही जंगली श्वापदे गावालगत येत असत; परंतु त्यांचा वावर हा शक्यतो डोंगरातील गुहा, कपारी यांमध्ये असे. तत्कालीन जंगलांची मुबलकता, जंगलात भक्ष्याची मुबलकता यांमुळे ही श्वापदे मानवी वस्तीपर्यंत येत नव्हती. काळानुसार वाघांची व इतर श्वापदांची संख्या नगण्य झाली; परंतु बिबट्यांच्या संख्येत मात्र वाढच होत गेली. 
जमिनीचे भाव गगनाला भिडले; त्यामुळे वृक्षतोड होऊन घरांची निर्मिती वाढली, जंगलक्षेत्र घटले. जंगलांना लागलेल्या वणव्यांमुळे जंगलात मिळणारी शिकार कमी झाली. जुन्नर तालुक्यातील येडगाव, पिंपळगाव जोगा, वडज, माणिकडोह, चिल्हेवाडी या पाच धरणांमुळे जमिनी, जंगले व गावे बुडाली. माणसांचा व पाळीव जनावरांच्या पुनर्वसनाचा प्रश्न शासनाने काही प्रमाणात सोडवला; परंतु जंगली श्वापदांचा विचार झाला नाही.
जंगली प्राण्यांच्या नैसर्गिक निवासस्थानांचा बोजवारा उडाला. दुसरीकडे, पाच धरणे आणि कालव्यांचे जाळे यामुळे जमिनी ओलिताखाली आल्या. साखर कारखानदारीमुळे शेतकरी कमी श्रमाच्या ऊसशेतीकडे वळला. सैरभैर झालेल्या बिबट्यांना मानवनिर्मित वस्तीस्थान तयार झाले आणि त्यांचा मानवी वसाहतीजवळचा वावर वाढू लागला.
ऊसशेतीजवळ असणाºया पाळीव जनावरांवर बिबट्याचा उदरनिर्वाह होऊ लागला. परंतु, पाळीव जनावरे बंदिस्त होऊ लागल्याने एकट्या-दुकट्या व्यक्ती, लहान मुले, शाळेत ये-जा करणारा विद्यार्थिवर्ग, शेतात काम करणारा महिलावर्ग यांच्यावर हल्ले वाढले. गेल्या १६ वर्षांत बिबट्यांच्या हल्ल्यात जवळजवळ तीन हजार पाळीव जनावरे मृत्युमुखी पडली. सुमारे दोनशे हेक्टर पिकांचे नुकसान झाले. आतापर्यंत २८ ते ३० व्यक्तींचे बळी गेले. नव्वद ते शंभराहून अधिक जखमी झाले. वन खात्याने १३५हून अधिक बिबटे पकडून काहींना उपचार करून पुन्हा सोडून दिले. तीस बिबटे जुन्नर येथील माणिकडोह निवारा केंद्रात आहेत.
बिबट्या पकडल्यानंतर त्याच्यावर उपचार करून सोडून देण्यापूर्वी त्याच्यावर जीपीआरएस यंत्रणा बसवण्याची गरज आहे. परदेशात या पद्धतीचा अवलंब केला जातो. 
जीपीआरएस यंत्रणा बसविल्यास प्रत्येक बिबट्याचा निश्चित ठावठिकाणा समजण्यास मदत होईल, बिबट्यांची संख्या निश्चितपणे कळण्यास मदत होईल. मात्र, आधुनिक पद्धतीकडे ना शासनाचे लक्ष आहे, ना वन विभागाचे! काही लोकांच्या मतानुसार बिबट्याचे संपूर्ण उच्चाटन करून टाकणे, हा उपाय सांगितला जातो. मात्र, हे म्हणजे रोगापेक्षा उपाय भयंकर, असा प्रकार आहे. 
…….
जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. वनांचे प्रमाण खूपच कमी झाल्याने ही समस्या उद्भवली आहे. जंगलाचे प्रमाण वाढविण्याठी झाडे लावण्याची गरज आहे. ज्या शेतकºयांच्या पाळीव प्राण्यांना बिबट्याने हल्ला करून ठार केले आहे, अशा शेतकºयांना लवकर भरपाई मिळण्याची गरज आहे. – वल्लभ शेळके,सामाजिक कार्यकर्ते 
…………
तालुक्यात सध्या बिबट्याचे अनेक ठिकाणी हल्ले वाढले आहेत. जंगलाचे प्रमाण कमी झाल्याचा हा परिणाम आहे. जास्तीत जास्त झाडे लावल्यास हा धोका टाळता येईल. बिबट्यांना पकडण्यासाठी जादा व आधुनिक पद्धतीचे पिंजरे मागवले आहेत.  – जयराम गवडा,सहायक वनरक्षक,जुन्नर
….
बिबट्या लोकांच्या नजरेस पडावा, यासाठी रात्रीचे वीजभारनियमन बंद करावे. बिबट्यांना पकडण्यासाठी वन विभागाकडे असलेले पिंजरे अतिशय जुन्या पद्धतीचे आहेत. वन खात्याने आधुनिक पद्धतीचे पिंजरे मागावेत- जानकू डावखर, अध्यक्ष, मुक्ताई देवस्थान ट्रस्ट, बेल्हे