Home ताज्या बातम्या बिल्ट कंपनीमुळे शेतीचे नुकसान : बाधितांचा आरोप

बिल्ट कंपनीमुळे शेतीचे नुकसान : बाधितांचा आरोप

पोंधवडी येथील शेतकऱ्याचे उपोषण

भिगवण : पोंधवडी (ता. इंदापूर) येथील बिल्ट कंपनीच्या वीज प्रकल्पातील कोळशाच्या डस्टमुळे प्रकल्पाशेजारी शेतीचे नुकसान होत आहे. याबाबत कंपनी व्यवस्थापनास वारंवार कळवुनही याबाबत योग्य निर्णय घेतला जात नसल्याने पोंधवडी (ता. इंदापूर) येथील शेतकरी सोमवार (दि. 1) पासून कंपनी गेटसमोर उपोषणास बसले आहेत. काही उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची प्रकृती ढासळली आहे. यानंतरही पाच दिवसात कंपनी प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही.

तुषार धनंजय खारतोडे (रा. पोंधवडी, ता. इंदापूर), असे कंपनीच्या गेटसमोर उपोषणास बसलेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे. इंदापूर तालुक्‍यातील भादलवाडी – पोंधवडी येथे बिल्ट ग्राफिक पेपर्स कंपनीचा कागद प्रकल्प आहे. या प्रकल्पामध्ये कोळशापासून वीज निर्मितीही करण्यात येते.

तुषार खारतोडे यांची वीज प्रकल्पाच्याशेजारी 15 एकर जमिन आहे. या प्रकल्पामुळे जमिनी नापीक होत आहे. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांना कळवूनही योग्य न्याय मिळत नसल्याने खारतोडे यांनी उपोषणास सुरुवात केली आहे. बिल्ट कंपनी प्रकल्पातील धुळीमुळे शेतीविषयक तसेच नागरी आरोग्यविषयक समस्याही निर्माण होत असूनही व्यवस्थापन याची माहिती वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवित नसल्याचे शेतकऱ्यांसह नागरिकांचेही म्हणणे आहे. याबाबत बिल्ट ग्राफिक कंपनीचे व्यवस्थापक बाळासाहेब सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन स्वीकारला नाही.