Home ताज्या बातम्या बिल्डरांकडून एकाच दिवसात १३.२५ कोटींची वसुली

बिल्डरांकडून एकाच दिवसात १३.२५ कोटींची वसुली

0

नागपूर : जीएसटी कायद्याचे पालन न करून करचोरी करणाऱ्या धुळे जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्राशी जुळलेल्या दोन कंपन्यांवर जीएसटी गुप्तचर महासंचालनालयाच्या (डीजीजीआय) नागपूर युनिटच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करून एकाच दिवसात १३ कोटी २५ लाख रुपयांचा वस्तू व सेवा कर (जीएसटी) वसूल केला आहे.
कारवाईनंतर कंपन्यांचे संचालक आणि कर्मचाºयांमध्ये एकच खळबळ उडाली. कार्यालयाची जागा बदलवून कंपनी जीएसटी चोरी करीत असल्याचे आढळून आले. कारवाईनंतर दोन्ही कंपन्यांनी जीएसटी भरला आहे.
अधिकाऱ्यांनी धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील शिरपूर कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडवर कारवाई करून ७.११ कोटी रुपयांचा जीएसटी वसूल केला. चौकशीदरम्यान कंपनीने कार्यालय दुसऱ्या जागी स्थलांतरित केल्याचे आढळून आले. याची माहिती जीएसटी कार्यालयाला देण्यात आली नव्हती. याप्रकारे कंपनी जीएसटीची चोरी करीत होती. जनक नीलेश पटेल हे कंपनीचे संचालक आहेत.
दुसरी कारवाई याच जिल्ह्यातील देवपूर येथील एस.बी. देशमुख कंपनीवर करण्यात आली. पंकज देशमुख आणि पवन देशमुख हे कंपनीचे भागीदार आहेत. त्यांच्याकडून ६.२९ कोटींची जीएसटी वसूल करण्यात आली. चौकशीदरम्यान देशमुख यांचे बयान घेण्यात आले.
एका जागेवर कंपनीचे कार्यालय सुरू केल्यानंतर ते बंद करून दुसऱ्या जागेवर कार्यालय सुरू करून जीएसटी चोरीची अनेक प्रकरणे पुढे आली आहेत. करचोरी करणाऱ्या अशा कंपन्यांवर जीएसटी गुप्तचर महासंचालनालयाच्या नागपूर युनिटचे अधिकारी लक्ष ठेवून आहेत. यापूर्वीही अशा प्रकारची प्रकरणे पुढे आली आहेत. यावेळी बांधकाम क्षेत्राशी जुळलेल्या दोन कंपन्यांवर २२ नोव्हेंबरला कारवाई करण्यात आली. जीएसटी गुप्तचर महासंचालनालयाच्या नागपूर युनिटचे सहसंचालक प्रदीप गुरुमूर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक क्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. दोन्ही कंपन्यांची सेवा कराची स्वतंत्र चौकशी करण्यात येत आहे.