मुंबई दि. २३ : बीएचएमएस, आणि सीसीएमपी. पात्र डॉक्टरांच्या नोंदणी प्रक्रियेसंदर्भातील शासन निर्णय आणि संबंधित कायदेशीर तरतुदींचे पालन करत नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.
बीएचएमएस, आणि सीसीएमपी. पात्र डॉक्टरांच्या नोंदणी प्रक्रियेसंदर्भातील विविध प्रलंबित बाबींचा आढावा घेण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन आयुक्त अनिल भंडारी, आयुष संचालनालयाच्या संचालक सापळे, मुख्य प्रशासकीय अधिकारी हेमंत पवार, महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेचे प्रशासक डॉ. बाहुबली शहा, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे प्रतिनिधी, इंटिग्रेटेड डॉक्टर्स असोसिएशनचे डॉ. अमोल आंबेकर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
इंडियन मेडिकल असोसिएशन यांनी मांडलेल्या सूचनांनुसार नोंदणी प्रक्रिया स्वतंत्र नोंदणी अभिलेखात करण्याबाबत तसेच बीएचएमएस, आणि सीसीएमपी. पात्र डॉक्टरांना कायद्यानुसार कोणत्या उपचारपद्धतींची परवानगी राहील, याबाबत स्पष्टता करण्यात आली. कायदेशीर बाबी, शासनाने वेळोवेळी यापूर्वी दिलेले निकष आणि लागू नियमांचा विचार करून नोंदणी प्रक्रियेची पुढील कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.
नोंदणी प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुलभ आणि नियमबद्ध करण्यासाठी मानक कार्यपद्धती स्पष्ट करण्यात आली. अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या पात्र डॉक्टरांच्या नोंदणीबाबत कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रियेला गती देण्यावर बैठकीत भर देण्यात आला. येत्या दोन दिवसांत तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून नोंदणी प्रक्रिया लवकरात लवकर नियमितपणे सुरू करावी.संबंधित सर्व विभागांमध्ये समन्वय साधून नोंदणी प्रक्रिया अधिक परिणामकारक, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
0000
शैलजा पाटील/विसंअ






















WhatsApp