बी.बी.एफ. (रुंद वरंबा सरी) तंत्रज्ञान : पर्जन्याधारित शेतीस वरदान – महासंवाद

बी.बी.एफ. (रुंद वरंबा सरी) तंत्रज्ञान : पर्जन्याधारित शेतीस वरदान – महासंवाद
- Advertisement -

अवर्षणप्रवण भागात शेती करताना पाऊस वेळेवर आणि प्रमाणात होईल याची खात्री देता येत नाही. त्यामुळे अशा भागात जलसंधारण व पाणी ताण कमी करणाऱ्या तंत्रज्ञानाचा अवलंब अत्यावश्यक असतो. यासाठी बी.बी.एफ. म्हणजेच ‘Broad Bed and Furrow’ (रुंद वरंबा सरी) पद्धत ही शाश्वत उत्पादनाची दिशा दाखवते.

बी.बी.एफ. म्हणजे काय?

‘बी.बी.एफ.’ तंत्रज्ञान म्हणजे रुंद वरंबा आणि सरी पद्धतीने जमिनीची मशागत करून बियाण्याची पेरणी करणे. या पद्धतीत शेतात सुमारे ६० सें.मी. रुंद वरंबा आणि ३० सें.मी. सरी अशा रचनेने शेताची रचना केली जाते. ही रचना बी.बी.एफ. यंत्राच्या मदतीने तयार होते.

या तंत्रज्ञानाची वैशिष्ट्ये :

सोयाबीन, तूर, मुग, उडीद, कापूस, मका, हरभरा आदी पिकांसाठी उपयुक्त.

अवर्षणप्रवण क्षेत्रात प्रभावी उपयोग, कारण जलसंधारण सहज साधता येते.बियाणे, खते यांत २०-२५% बचत, त्यामुळे निविष्ठा खर्च कमी. २५ ते ३०% पर्यंत उत्पादनात वाढ.

तांत्रिक फायदे :

उताराच्या आडवी पेरणीमुळे जलसंधारण सुधारते, माती व पाणी दोन्ही साठते. पावसाचा खंड असला, तरी पाण्याच्या ताणाची तीव्रता कमी होते.जास्त पाऊस झाल्यास अतिरिक्त पाणी सऱ्यांमधून वाहून जाते, झाडांना पाणी साचत नाही.पिकाला भरपूर हवा आणि सूर्यप्रकाश मिळतो — रोपे जोमदार वाढतात.आंतरमशागत व फवारणी करणे सोपे — ट्रॅक्टर किंवा फवारणी यंत्र वापरता येते.मातीची धूप कमी होते आणि तिची भुसभुशीतता व सच्छिद्रता वाढते.

बी.बी.एफ. हे एक शाश्वत, खर्चिक बचत करणारे, उत्पादनवाढीस पोषक आणि पर्जन्याधारित शेतीस पूरक असे अत्यंत उपयुक्त तंत्रज्ञान आहे. योग्य नियोजनाने याचा अवलंब केल्यास शेतकरी बांधवांना हवामान बदलाशी सामना करत उत्तम उत्पादन घेता येईल.

00000

स्रोत : कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे

संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव

 

- Advertisement -